बुलढाणा: वादग्रस्त आणि आक्रमक आमदार संजय गायकवाड यांचा मतदारसंघ ही बुलढाणा विधानसभेची नवीन ओळख निर्माण झाली आहे. सन २०१९ च्या लढतीत आमदार झाल्यावर संजय गायकवाड यांनी आपला स्वभाव, वक्तव्याची आणि विरोधकांची कधीच तमा बाळगली नाही. कोणताही आरोप मान्य केला नाही, वादग्रस्त वक्तव्ये, वर्तणूकीचे ठासून समर्थन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी भाजपला अंगावर घेतले. देवेंद्र फडणवीस, नारायण राणे ते जिल्ह्यातील आमदार संजय कुटे, श्वेता महाले , आकाश फुंडकर, माजी आमदार विजयराज शिंदे देखील तडाख्यातून सुटले नाही. सेनेतील बंडाळी नंतर ते सुरत मार्गे गुवाहाटी पर्यंत पोहोचले. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या गळ्यातील ताईत बनले. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे यांना त्यांनी धारेवर धरले. त्यांची वक्तव्ये, सार्वत्रिक व्हिडीओ, त्यांच्या वर होणारे आरोप प्रत्यारोप राज्य स्तरावर बातम्यांचा विषय ठरले. अजित पवार, अंबादास दानवे, सुषमा अंधारे, संजय राऊत ते विजय वडेट्टीवार, आणि स्थानिक नेत्यांच्या ते कायम रडार वर राहिले.

विकासावर भिस्त

साडेचार वर्षे वादाचे वादळ घोंगावत राहिले असताना आता बुलढाणा मतदारसंघात निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहे. बुलढाण्यातून इच्छुक काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, जयश्री शेळके, संजय राठोड, ठाकरे गटाचे जालिंदर बुधवत, यांचे देखील आमदारच लक्ष्य आहे. सपकाळ यांनी त्यांच्याविरुद्ध ‘ऑन आणि ऑफ लाईन’ मोहीमच उघडली आहे. शेळके यांनी त्यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या बुलढाण्यातील महापुरुष पुतळे व स्मारक मध्ये ‘ स्ट्रक्चरल ऑडिट’ चा अडसर आणण्याचा प्रयत्न केला. मात्र हा डाव उधळून लावत आमदार गायकवाड यांनी अनावरण साठी मुख्यमंत्री शिंदेंची तारीख देखील मिळवून घेतली.

हे ही वाचा…हवामान बदलामुळे डासांची शक्ती चारपट वाढली; डेंग्यू, चिकनगुनिया वाढण्यामागचे कारण अभ्यासातून उघड

विरोधकांना आपण पुरून उरणारच या त्यांच्या आत्मविश्वासाला केलेली विकास कामे कारणीभूत मोठा घटक आहे. त्यांची विकास कामे, खेचून आणलेला विकास निधी यावर विरोधक देखील फारशी टीका करू शकत नाही. पुतळे स्मारक मूळे बुलढाण्याचे रुपडे पालटले ही सामान्य बुलढाणेकरांची भावना आहे. अडगळीतील शासकीय कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजूर करून घेत त्यांनी ‘मेडिकल कॉलेज’ मार्गी लावले. बोदवड सिंचन उपसा योजनेची अशीच स्थिती. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पुढाकाराने मंजूर झालेला मात्र लाल फितीत बंद झालेला हा प्रस्ताव त्यांनी मार्गी लावला. पलढग धरणातून गुजरात कडे जाणारे पाणी अन्य धरणात नेण्याचा प्रकल्प उपयुक्त असाच ठरावा. मतदारसंघात विणलेले रस्त्यांचे जाळे, बुलढाण्यातील रस्त्यांची दुरवस्था दूर करून सौन्दर्यीकरण साठीची धडपड बुलढाणेकरांच्या कौतुकास पात्र ठरली. आमदारांच्या एका हातात वादंग, वाद , वादळ ही शस्त्रे आहेत तर दुसऱ्या हातात विकासाचे शास्त्र देखील आहे. हा विकास आपली मुख्य ताकद असल्याचे ते सांगतात.

हे ही वाचा…बुलढाणा : रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; ११ सप्टेंबरला मंत्रालयात बैठक

सोशल इंजिनिअरिंग…

महायुती सत्तेत आल्यावर आमदारांनी भाजपशी जुळवून घेतले. विकास कामे, जनसंपर्क याला ‘सोशल इंजिनिअरिंग’ ची जोड दिली आहे. मतदारसंघातील जुने जाणते शिव सैनिक, अन्य राजकीय पक्षांतील जनाधार प्राप्त असंतुष्ट नेत्यांना सेनेत आणले. त्यांना ‘रोजगार’ देऊन राजकीय पुनर्वसन केले. चिरंजीव मृत्यूंजय आणि पृथ्वीराज गायकवाड यांच्यावर शाखा बांधणी आणि धर्मवीर फौंडेशन ची जवाबदारी देत युवकांना जवळ केले. लाडकी बहीण योजना आणि बांधकाम कामगार योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यात महिला आणि पुरुषांची फरफट झाली. बुलढाण्यात आमदारांनी स्वतंत्र यंत्रणा उभारली. विशेष कक्ष उभारून सर्व जाती धर्माच्या ‘बहिणीं’चे अर्ज भरून घेतले, बांधकाम साहित्य व भांड्याचे संच गावो गावी लाभार्थ्यांच्या हाती पोहीचतील याची तजवीज केली. त्यावर ‘त्यांनी स्वतःचे स्टिकर लावले’ या टिके ऐवजी इतर पक्षांनी काहीच केले नाही. महापुरुषांचे पुतळे उभारताना त्यांनी त्या त्या समाजाच्या समित्या स्थापन केल्या.लोकार्पण नंतर पुतळ्याची जवाबदारी समित्याकडे राहणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुस्लिम, आंबेडकरी समाजा मध्ये जागा तयार करण्याचे प्रयत्न त्यांनी चालविले आहे. मतदार संघात बांधलेले ६५ बुद्ध विहार, उपलब्ध करून दिलेल्या मुर्त्या याचे द्योतक आहे.यामुळे साम- दाम- दंड- अश्या सर्व नीतीचा वापर करणारे गायकवाड यंदाही सर्व इच्छुक उमेदवार, विरोधी पक्ष यांचे लक्ष्य आहे. त्या तुलनेतआघाडीमधील जागा वाटप अनिश्चित आहे, मित्र पक्षात एकवाक्यता नाही असे चित्र आहे. ठाकरे गटाला जागा सुटली तर जालिंदर बुधवत यांच्याशिवाय अन्य पर्याय नाही. निष्ठावान की मेरिट या मुद्यावर वर ‘बाहेरचा’ उमेदवार द्यायचा की नाही याबद्धल ‘मातोश्री’ संभ्रमात आहे. काँग्रेसला जागा सुटली तर उमेदवाराला पाडण्यासाठीच इतर गट प्रयत्न करणार इतकी टोकाची गटबाजी आहे. यामुळे विरोधक इच्छुकांचे लक्ष्य गायकवाड असले तरी त्यांनी तयार केलेला चतुरंग सेनेचा चक्रव्यूह भेदणे वाटते तेवढे सोपे नाही.