बुलढाणा : हाणामारी, भांडण, फ्रिस्टाईल पद्धतीने दोघात किंवा अनेक लोकात मारामारी ही काही नवीन बाब राहिली आहे. शहरी भागातील वसाहती, अपार्टमेंट, उप नगरे, झोपडपट्टी ते ग्रामीण भागातील वाडी, तांड्यात भांडण, हाणामारी ही नित्याचीच बाब ठरली आहे. मात्र या हाणामारीचे लोन सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, मैदानेपर्यंत गेले आहे. त्यामुळे मायबाप जनता अशा घटनांना गंभीरतेने घेत नाही. पायी असले तर काही मिनिटे थांबून किंवा वाहनात असले तर गाडी चालवता चालवता ढुंकून पाहायचे अन् पुढे निघून जायचं असं धोरण असते.
आता हे हाणामारी पुराण आठवायचे किंवा उगळायचे कारण देखील तेवढेच मजेदार आहे. याचे कारण बुलढाणा शहरातील एका रुग्णालयात दोन व्यक्ती नव्हे जवळच्या नातेवाईकात फ्रिस्टाईल हाणामारीची घटना घडली. दवाखाना पण साधा वा लहान नाही. तर ही हाणामारी चक्क बुलढाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमध्ये रंगली. त्यातही बेभान होऊन एकमेकांवर निकराने तुटून पडणारे हे दोघे वीर जवळच्या नात्यातील होते. दोघांतील नातेही तसं नाजूक असं. हे दोघेही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी वार्ड पाच मध्ये भरती असलेल्या नातेवाईकला भेटण्यासाठी, तिच्या तब्येतीची विचारपूस करायला आले होते.
मात्र चांगल्या उद्देशाने आलेल्या या ‘जिजा-साले साहब’मध्ये अचानक काय वाईट झाले, काय बिनसले कुणास ठाऊक. या दोघात अचानक वाद सुरु झाला. या वादाचे पर्यवसन वादंग, अश्लील शिवीगाळ, आई-बहीण काढण्यापर्यंत टोकाला गेला. पाहतपाहता दोघे एकमेकावर धावून गेले, अंगाला भिडले. हाता पायाने एकमेकांना मारणे सुरु केले. यामुळे गर्दीच्या जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाला, इतर रुग्ण नातेवाईक घाबरून पळायला लागले.
बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती असलेल्या एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याच्या घटनेची माहिती इतरत्र पसरताच नागरिक घटनास्थळी दाखल झाले. काही मिनिटे चाललेल्या या हाणामारीचे काहींनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले. शेवटी रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाजूला करीत भांडण सोडवले.
प्राप्त माहितीनुसार
वार्ड क्रमांक पाच मध्ये एक महिला रुग्ण उपचार घेत आहे. या महिलेचे पती आणि भावांमध्ये वाद होऊन वार्डातच हाणामारीला सुरुवात झाली. या प्रकारानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती तर रुग्णांमध्ये देखील भीतीच वातावरण पाहायला मिळाल, काही वेळानंतर सुरक्षा रक्षकांना बोलवून दोन्ही तरुणांना बाहेर काढण्यात आले.अर्थात हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय हे सांगायची गरजच नाही.