बुलढाणा : जून महिन्यापासून अतिवृष्टी आणि अधूनमधून ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली आहे. ही दुर्दैवी मालिका कायम आहे.काल रात्री पासून आज सकाळ पर्यंत बुलढाणा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. मात्र घाटाखालील तालुक्याच्या तुलनेत घाटावरील भागात पावसाची तीव्रता जास्त होती. घाटावरील पाच तालुक्यात कोसळधार पावसाने हजेरी लावत होत्याचे नव्हते करून टाकले. तब्बल १४ महसूल मंडळात अतिवृष्टीने अक्षरशः थैमान घातले आहे.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवीत कोसळधार पाऊस बरसला. सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टीची ( ६५.३मिमी पावसाची ) नोंद झाली. सिंदखेड राजा महसूल मंडळात ६८ मिमी, किनगाव राजा मंडळात ७४, शेंदुरजन मध्ये ६७ मिमी तर मलकापूर पांग्रा महसूल मंडळाला ८३ मिलिमिटर इतक्या धोधो पावसाने झोडपले. ६२ मिमी पावसाची नोंद झालेल्या बुलढाणा तालुक्यातिल पाडळी मंडळात ६८ मिमी, म्हसला मंडळात ८५मिमी तर देऊळघाट मंडळात ६८ मिमी पाऊस बरसला. यामुळे पैन गंगा नदी दुथडी भरून वाहत असून नदीवरील येळगाव धरण तुडुंब भरले आहे.
चिखली तालुक्यातील अमडापूर आणि उंद्री (उदयनगर ) मंडळात प्रत्येकी ६५. ८ मिमी पावसाने अनेक गावाना तडाखा दिला. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा मंडळात ७७ तर शेलगाव मंडळात ६५. ३ मिमी पावसाने हजेरी लावली. मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख ७०मिमी, डोणगाव मंडळात ७०मिमी पावसाने झोडपले. घाटावरील भागाच्या तुलनेत घाटा खालील सात तालुक्यात पावसाचा जोर कमी होता. मलकापूर मध्ये सर्वाधिक म्हणजे ४६ मिमी पावसाची नोंद झाली. उर्वरित सहा तालुक्यात १६ ते ३४ मिमी दरम्यान पावसाची नोंद झाली आहे.
शेती जलमय, नदी नाल्यांना पूर
या कोसळधार पावसामुळे घाटावरील पाच तालुक्यातील हजारो हेक्टरवरील शेती पाण्यात बुडाली असून तोडणीला आलेल्या खरीप पिकांची अतोनात नासाडी झाली आहे.