बुलढाणा : खाऱ्या पाण्याच्या सरोवरामुळे जगविख्यात असलेल्या लोणार नगरीचा पुराण काळातील पौराणिक ग्रंथात देखील उल्लेख आहे. अयोध्येचे युवराज श्रीरामचंद्र, त्यांच्या अर्धांगिनी सीतामाई आणि बंधू लक्ष्मण यांनी आपल्या वनवास काळात लोणार सरोवर परिसरात वास्तव्य केल्याचा उल्लेख आहे. अंतराळातून विशाल उल्का या भूमीत कोसळल्याने या सरोवरची निर्मिती झाली. या सरोवर परिसरात सीता न्हाणी आहे. अनेक पुरातन मंदिर देखील या नगरीत आहेत.
असा पौराणिक वारसा लाभलेल्या लोणार शहरात आज शुक्रवार १६ मे रोजी अभूतपूर्व, विलोभनीय आणि शब्दाच्या पलीकडील, अवर्णनीय असा किराणोत्सव रंगला. हा उत्सव मानवी वा ‘इव्हेंट’ नसून तो नैसर्गिक उत्सव आहे. त्याला पुरातन भारतीय स्थापत्य शास्त्र, खगोल शास्त्र याचा मिलाफ देखील म्हणता येईल. येथील पुरातन दैत्यसूदन मंदिरात दरवर्षी मे महिन्यात केवळ आणि केवळ पाच दिवस हा सूर्य किरणांचा अद्भुत खेळ रंगतो . यावेळी श्री चरणी शहस्त्र सूर्य किरणे प्रकाश रुपी अभिषेक करतात . यामुळे किरणोत्सव याची देही याची डोळा पाहण्यासाठी दूरवरचे पर्यटक आणि भाविक सरोवर नगरीत डेरे दाखल होतात. शुक्रवार पासून या किरणोत्सवाला प्रारंभ झाला. येत्या २० मे पर्यंत हा सूर किरणांचा आणि श्री चरणी तेजोमय अभिषेकाचा खेळ रंगणार आहे.
शुक्रवारी सकाळी ११ ते ११. ४५ वाजेदरम्यान असा तब्बल पाऊण तास श्रींच्या चरणी सूर्य अभिषेक होत असतानाचे मनोहरी आणि दुर्मिळ दृश्य शेकडो भाविकांनी याची देही याची डोळा पाहिले, अनुभवले व हृदयात साठवले. यावेळी लोणार सह दूरवरच्या शेकडो भाविक, पर्यटक आणि अभ्यासकांची गर्दी होती.
लोणार येथील १ हजार वर्षांपूर्वी च्या दैत्य सुदन मंदिरात दर वर्षी १६ मे ते २० मे पर्यंत भगवान श्री विष्णु यांच्या चरणी साक्षात सूर्यदेव सूर्य किरणांनी अभिषेक करतात. आज पासून याला सुरवात झाली हे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी अलोट गर्दी केली होती.पुरातत्व विभागाने येणाऱ्या प्रत्येक भाविकांना दर्शन व्हावे या साठी उत्तम व्यवस्था केली होती.तसेच पिण्याच्या पाण्याची सुध्दा व्यवस्था करण्यात आली होती.
ढगाळ वातावरणताही…
सूर्य किरणांचा अभिषेक समाप्ती झाल्या नंतर महा आरती करण्यात आली संपूर्ण मंदिर परिसर भाविक भक्तांनी गजबजून गेला होता. दरम्यान, उपस्थिताना निसर्गाच्या चमत्कार किंवा लिलेचा देखील प्रत्यय आला. मागील काही दिवसापासून लोणार शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. वळव्याच्या पावसाने नियमित अंतराने हजेरी लावली. आज सकाळी देखील ढगाळ वातावरण होते. यामुळे भाविकांच्या मनात धाकधूक होती. आजही असे असतानाही सूर्य किरण अभिषेकच्या वेळात आज लख्ख असे सूर्यनारायणाचे दर्शन घडून आले. सहस्त्र किरणांनी श्री चरणी पाऊण तास अभिषेक केला. यामुळे अंधारलेला गाभारा प्रखर तेजाने उजळून निघाला. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे
लोणार सरोवरात आणि सभोवताली खूप प्राचिन मंदिरे आढळून येतात, त्यातीलच एक आहे सुबक दगडी कोरीव कलाकुसर असलेले प्राचीन मंदिर म्हणजे दैत्यसूदन मंदिर. शेकडो वर्ष जुने असलेले हे मंदिर शहराचा एक अनमोल ठेवा आहे. या मंदिराची कलाकुसर थेट कोनार्क च्या सूर्य मंदिराशी मिळतीजुळती असलेली आढळून येते, भगवान विष्णूंच्या दैत्य सुदन अवतारला समर्पित असलेले हे मंदिर बघण्यासाठी पर्यटकांची नियमित वर्दळ असते. आज रवी जावळे यांनी येणाऱ्या भाविकांसाठी लाडू चा प्रसाद ठेवला होता. हे प्रसाद वाटप २० तारखे पर्यंत सुरू राहणार आहे. आज या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाणेदार निमिष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनात पोलीस तैनात करण्यात आले.