बुलढाणा : बदल होणार बदल होणार, अशा दीर्घ काळापासून सुरू असलेल्या चर्चेनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जिल्हाध्यक्ष बदलला आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी तरुणतुर्क समजले जाणारे नरेश शेळके यांची वर्णी लागली. शरद पवारांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर भाकर फिरविण्याचा हा निर्णय घेतला. यामध्ये पक्षातील दुसऱ्या फळीतील नेते म्हणून समजल्या जाणाऱ्या शेळकेंना कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. वरकरणी हा ‘साहेबांचा’ वा औपचारिकरित्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा निर्णय असला तरी यामध्ये ‘ताईंचा’ मोठा वाटा असल्याची चर्चा रंगली आहे.

एकसंघ राष्ट्रवादीपासूनच खासदार सुप्रिया सुळे यांचे विश्वासू, अशी शेळकेंची ओळख. त्यामुळे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष रेखा खेडेकर यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या राजीनाम्याची फारशी गंभीर दखल न घेता शेळके यांच्यावर मोठी जवाबदारी टाकण्यात आली. पक्षाचे जिल्ह्यातील मोठे नेते, विदर्भ प्रभारी, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या बरोबरीने शेळके यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींना सामोरे जावे लागणार आहे.

नियुक्तीनंतर लगेचच त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणुकांचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभाजनामुळे आणखी दुबळ्या झालेल्या पक्षाचे संघटन, विस्तार करण्याचे आणि या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांची नाराजी दूर करणे, असे तिहेरी आव्हान शेळकेंसमक्ष उभे ठाकले आहे. या आव्हानपाठोपाठ होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढतीत पक्षाला मर्यादित का होईना, यश मिळवून देण्याचे सर्वात मोठे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे. यामुळे जिल्हाध्यक्षपदाची इच्छा पूर्ण झाली असली तरी शेळकेंची पुढील राजकीय वाटचाल अतिशय खडतर आहे, हे तेवढेच खरे! मंगळवारी संध्याकाळी मुंबईत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते शेळके यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यानंतर शरद पवार यांची साथ न सोडणाऱ्यांना प्राधान्य दिल्या जात आहे. जे निष्ठावान आहेत आणि पक्षाशी प्रामाणिक आहेत, त्यांची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतल्या गेली.

जिल्हाध्यक्ष म्हणून मागील दोन वर्षांपासून शेळके यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, ज्येष्ठ नेत्या व माजी आमदार रेखा खेडेकर यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व सोपविण्यात आले. शेळके यांना कार्याध्यक्षपदी समाधान मानावे लागले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुप्रिया सुळेच्या नेतृत्वात शेळके यांनी काम केले. पक्ष संस्थापक शरद पवार यांना आयुष्यभर साथ देणाऱ्यांचा सत्कार करीत ‘शिलेदार निष्ठेचे’ हा पुरस्कार उपक्रम त्यांनी यशस्वी केला होता. त्यांच्या या उपक्रमाचे पक्षाने कौतुक करीत राज्यभर ‘शिलेदार निष्ठेचे’ हा कार्यक्रम राबविण्याच्या इतर जिल्ह्यांना सूचना केल्या होत्या. आता त्यांना निष्ठेचे फळ मिळाले आहे.