बुलढाणा: अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पावनभूमीत, गुरुकुंज मोझरी येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे . राज्यातील युती सरकारच्यावतीने माजी आमदार कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन मागे घ्यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र आपली प्रकृती अतिशय खालावलेली असतानाही बच्चू कडू हे आपल्या आंदोलनावर ठाम आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी, दिव्यांगांना ६ हजार रुपये मानधन मिळावे आणि अन्य न्याय्य मागण्यांसाठी त्यांनी आपले प्राण पणाला लावले आहेत. त्यांच्या या बेमुदत उपोषणाला विदर्भात सर्वदूर पाठींबा मिळत आहे. अमरावती विभागात वेगवेगळी आंदोलने करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्हाही याला अपवाद नाही. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे आज शनिवारी, १४ जून रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करून बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) च्या वतीने जळगाव तहसील कार्यालयासमोर जळगाव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा कार्याध्यक्ष तथा जळगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती अडव्होकेट प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात हे एकदिवस उपोषण करून बच्चू कडू यांना पाठबळ देण्यात आले. तसेच त्यांच्या रास्त मागण्याना समर्थन देण्यात आले. जळगाव तहसील समोर करण्यात आलेल्या या आंदोलनात जळगाव शहर व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) चे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले. यावेळी, ‘ बच्चूभाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है, असा कसा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, तिघाडी सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’, अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. या घोषणांनी जळगाव तहसील परिसर दणाणला. यावेळी तहसीलदार यांना मांगण्यांचे निवेदन देण्यात आले.
प्रहारचे उद्या चक्काजाम
दरम्यान जिल्हा प्रहार जन शक्ती पक्षातर्फे उद्या रविवारी बुलढाणा जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. प्रहार जन शक्तीचे वैभव मोहिते यांनी ही माहिती दिली. सात दिवस उलटूनही दळभद्री राज्य सरकारने बच्चूभाऊंच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे १५ जून रोजी बुलढाणा जिल्ह्यात ठीक ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. बच्चू कडूंच्या संघर्षाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पाठिंबा मिळत आहे. १५ जून रोजी राज्यभर चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, बुलढाणा जिल्ह्यातही ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात प्रहारचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही मोहिते यांनी केले आहे.
दरम्यान किसान एकता महासंघाचे राजेंद्र ससाने,एमआयएमचे समीर आर्यन, कॉंग्रेसचे अब्दुल जहिर यांनी राष्ट्रवादीच्या जळगाव जामोद येथील उपोषण आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला. आंदोलनात विश्वास भालेराव, विजय पोहनकार, प्रमोद सपकाळ,ईरफान खान, एम.डी.साबीर, शेख जावेद, करीम खान, मोहसीन खान, महादेव भालतडक,मनोहर वाघ, बंडू पाटिल,सुभाष कोकाटे, आशिष वायझोडे, दत्ता डिवरे, एजाज देशमुख, एकनाथ ताठे,अताउल्लाह खान, श्रीकृष्ण जाधव,संदिप ढगे, राजु पाटिल अवचार,अजय गिरी, अमित देशमुख, गोकुल बावस्कार,ज्ञानेश्वर तेल्हारकर,दिपक वानखड़े, कैलास मानकर, राहुल चंदनकार, प्रशांत अवचार,गुणवंत वाघ,ज्ञानेश्वर खिरोड़कार, सुपड़ा ताकोते, विजय चोपडे, ओम देशमुख, सैय्यद शाकिर, राजू मुल्लाजी,अतुल वाघ, गजानन भालतडक, शेख मोसीन उपस्थित होते.