बुलढाणा: कारवाई न करण्यासाठी चित्रपट निर्मिती क्षेत्रातील परप्रांतीय व्यक्तीकडून आधी दीड हजार रूपये उकळून नंतर पुन्हा त्याच्याकडे दोन लाखांची मागणी करणाऱ्या पोलिसाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

कायद्याचे रक्षक भक्षक होण्याच्या या घटनेबद्धल चिखली परिसरासह बुलढाणा जिल्ह्यात खमंग चर्चा होत आहे. पोलीस विभागाची प्रतिमा मलीन करणाऱ्या काही पोलिसांचे कारनामे चव्हाट्यावर आले आहे. दरम्यान पोलीस दलाची बेआब्रू करणाऱ्या वाहतूक शाखा आणि चिखली पोलीस ठाण्याशी संबंधित मिळून पाच पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशाने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आज बुधवारी, ६ ऑगस्ट रोजी सहा पोलिसाविरुद्ध अप. क्र. ६१०/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०८(२),३०८(३),३५१(२),३(५) नुसार चिखली पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यातआले. ताज अब्दुल रहेमान रहमततुल्ला, (वय २३ वर्ष, व्यवसाय फिल्म मेकर, राहणार गांधीनगर चल्लेकेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक) असे पोलिसांकडून लुबाडणूक करण्यात आलेल्या पीडित व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांच्या या अजब कारवाईने भयभीत झाल्याने त्यांच्या वाहनाला अपघात देखील झाला आहे. त्यांनी या घटनेची बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली आहे. त्यावरून आज ६ ऑगस्ट रोजी गुन्हे दाखल करण्यात आले. फिर्यादी हे कर्नाटक राज्यातील असल्याने त्यांना पोलिसांची नावे माहीत नव्हती. त्यामुळे तक्रारीत पोलिसांच्या नावाचा आणि पदांचा उल्लेख नाही. या गंभीर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर करीत आहे.

काय घडलं?

चिखली पोलीस ठाणे हद्धीतील बुलढाणा बायपास रोड चिखली परिसरात हा खळबळ जनक घटनाक्रम घडला आहे. फिर्यादी ताज अब्दुल रहेमान हे त्यांच्या सहकाऱ्यासह त्यांचे तवेरा कार (क्रमांक के ए ११ २८६२ ने मलकापूर कडे जात असताना दोन वाहतूक पोलीस पोलिसांनी त्यांची त्यांची गाडी अडविली. पोलीस कारवाई न करण्यासाठी बाजूला असलेल्या चहाच्या दुकानदाराच्या पेटीएम वर दीड हजार रूपये रुपये टाकण्यास सांगितले. फिर्यादीने त्याचा सहकारी जुबेर अहेमद याचे पेटीएम वरुन दीड हजार रुपये पाठविले. त्यानंतर सदर फिर्यादी हे समोर गेले असता पांढऱ्या रंगाच्या किया कारने सदर वाहनाचा पाठलाग करण्यात आला.

फिर्यादीचे वाहन थांबविले व कार मधील ३ अनोळखी पोलिसांनी कागदपत्रे तपासून फिर्यादीचे गाडीतील सरावासाठी विकत घेतलेली एअर रायफल पाहून ‘त्या’ तीन पोलिसांनी त्यांना पोलीस कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयाचे मागणी केली त्यावेळी फिर्यादीने घाबरून एवढे पैसे नसल्याचे सांगितले असता सदर पोलिसांनी त्यांना पन्नास हजार रुपयांची व्यवस्था करण्याचे सांगितले. फिर्यादीस सदर पोलीस खरेखूरे पोलीस नसल्याची शंका आली. त्यामुळे ताज अब्दुल याने जोराने गाडी घेऊन देऊळगाव राजा च्या दिशेने नेली. यावेळी त्यांच्या गाडीत बसलेल्या पोलीसाने गाडी थांबविण्यास सांगून खाली उतरून गेला.

फिर्यादी समोर गाडी घेऊन जात असताना घाबरल्याने त्याचे तवेरा गाडीवरील नियंत्रण सुटून त्याची गाडी रोडचे बाजूला उलटली. त्यानंतर सदर 3 पोलीस तेथे आले व पैशाचा विषय करत असतांना तेथे स्थानिक पोलीस आल्याचे पाहून फिर्यादीस सदर घटना न सांगण्याची धमकी दिली. असे दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.