बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेल्या १९ मार्च रोजीच्या मुंबईतील नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना आज रविवारी, १६ मार्च रोजी नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता आंदोलन करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असे या नोटीस मध्ये नमूद आहे. दरम्यान अशा नोटिसांची आपण तमा बाळगत नाही, काहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणारच असा निर्धार रविकांत तुपकर यांनी यावेळी जाहीर केली आहे.

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, पिकविमा, सोयाबीनचा -कापसाचा भावफरक यासह सोयाबीन- कापूस, ऊस, कांदा, धान, दूध उत्पादकाना मदत व भाववाढ आदि मागण्यांसाठी शेतकरी, १९ मार्च रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात सातबारे बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहेत तसेच सोयाबीन कापूस बुडवून विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधणार आहे. १८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता बुलडाणा शहरातील क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटर वरून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी मुंबईकडे आगेकूच करणार आहेत.

दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना कलम १६८ नुसार नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आंदोलन करू नये अशी तंबी देण्यात आली आहे. तरीही आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे नोटीसमध्ये नमूद आहे.

‘नोटिसांनी कपाट भरली’

दुसरीकडे रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना ते म्हणाले की, अशा नोटिसांनी आपल्या घरातील कपाट भरले आहे, या नोटीसला आम्ही घाबरत नाही असे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. आंदोलन दडपण्याचा आणि शेतकरी चळवळ बंद पाडण्याचा हा शासनाचा आणि प्रशासनाचा डाव आहे, परंतु आम्ही डगमगणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणारच अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली .

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेड मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, ऊसाला एकरकमी एफआरपी द्यावी यासह कांदा, दूध, धान व इतर उत्पादनाना अनुदान ज्यावेळेस इतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत. या आंदोलनात कुठेही हिंसा होणार नाही, कायदा हातात घेतला जाणार नाही आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत, तरीही पोलिसांनी नोटीस देऊन आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. अशा कितीही नोटीस दिल्या तरी आम्ही आंदोलन करणारच असे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१८ मार्च रोजी सकाळी नऊ वाजता बुलढाण्यात सगळे शेतकरी एकत्र जमणार आहेत व तेथून मुंबईकडे आगेकूच करणार आहेत. रात्री मुंबईच्या वेशीवर मुक्काम करून १९ मार्च रोजी सकाळी सगळे शेतकरी नरिमन पॉईंट येथे अरबी समुद्रावर पोहोचणार आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा हक्क मागण्यासाठी जात आहोत त्यामुळे पोलिसांनी उगीच अडवा – आडवी करू नये, आम्हाला मुंबईत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशाराही तुपकर यांनी दिला आहे.