बुलढाणा : आपल्या आईच्या संरक्षणात बागडणारे ‘बाळ ‘ नजरचुकीने एका विहिरीत पडले. त्याची माता त्याच परिसरात दिवसभर घुटमळत राहिली. अखेर अनेक तासानंतर दोघांची भेट झाल्यावर कुठे ती शांत झाली.

एरवी क्रूर, हल्लेखोर समजली जाणाऱ्या बिबट मातेच्या वात्सल्याचा हा घटनाक्रम आहे. चार महिन्यांचे बिबट्याचे पिल्लू एका विहिरीत पडले होते. बुलढाणा वन विभागाच्या बचाव पथकाने जाऊन या पिल्लाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून काल शनिवारी रात्री पिल्लू व आईची पुनर्भेट घडवून आणण्यात वन विभागाला यश आले आहे.

चार जानेवारी रोजी सकाळी खामगाव तालुक्यातील निरोड शिवारात हा घटनाक्रम घडला. महादेव रावनकर यांच्या शेतातील पंचवीस फुट खोल विहिरीत बिबट्याचा पिल्लू पडल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली . याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर बुलढाणा येथून ‘रेस्क्यू टीम ‘ ला पाचारण करण्यात आले.

हेही वाचा – नागपूर पोलिसांना झाले तरी काय? दोन वसुलीबाज हवालदार निलंबित

या पथकाने विहिरीत पडलेल्या चार महिन्यांच्या मादी बिबटला पिंजऱ्याच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. खामगाव येथे नेऊन पशुधन विकास अधिकारी खामगाव व डॉक्टर मयुर पावसे गोरेवाडा प्राणी संग्राहलय नागपूर यांनी बिबट पिल्लाची तपासणी केली. सदर पिल्लू सुदृढ असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर बुलढाणा उपवनसंरक्षक श्रीमती सरोजा गवस, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती अश्विनी अपेट व वनपरीक्षेत्र अधिकारी खामगाव यांनी विचारविनिमय केला. यानंतर सदर मादी बिबट आणि तिच्या पिल्लाची काल रात्री पुनर्भेट करून देण्यात आली. त्यांना एकत्र निसर्गमुक्त करण्यात आले. ही कार्यवाही संदीप मडावी, अमोल चव्हाण, अक्षय बोरसे, लता अबुलकर व रवींद्र मोरे यांनी पार पाडली.

उपद्रवी माकडांना केले जेरबंद

दरम्यान मोताळा शहरात धुमाकूळ घालणाऱ्या दोन उपद्रवी माकडांना बुलडाणा वन विभागाच्या बचाव पथकाने जेरबंद केले आहे. मागील काही दिवसांपासून मोताळा येथे या माकडांनी धुमाकूळ घातला होता. त्यामुळे काही गावाकऱ्यांची टीनपत्रे वाकली, साहित्याचे नुकसान झाले काही ठिकाणी या माकडांनी नागरिकावर हल्ले देखील करण्याचा प्रयत्न केला. या माकडांनी नागरिकांना त्रस्त करून सोडले. त्यामुळे याची माहिती मोताळा वन विभागाला देण्यात आली. बुलडाणा येथून वन विभागाच्या पथकाला बोलविण्यात आले. माकडांच्या या टोळीतील दोन उपद्रवी माकडांचा शोध घेऊन रेस्क्यू पथकाने बेशुद्ध केले. दोन्ही माकडांना पकडून ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरूप सोडण्यात आले आहे.

हेही वाचा – बुलढाणा : रात्रीची वेळ; बार मालकाच्या गळ्याला चाकू लावला अन…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोताळा वनपाल आनंदा सपकाळ, पथकातील संदीप मडावी, अमोल चव्हाण, अक्षय बोरसे, वैभव पुंड व संतोष जाधव यानी ही कारवाई केली. यामुळे मोताळा शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.