बुलढाणा : भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा पाहून करोडो भारतीयांची मान अभिमानाने ताठ होते. भारतीयांचे स्फूर्तीस्थान आणि प्रेरणा असलेला तिरंगा फडकताना पाहून मन आनंदित होते, देशप्रेम जागृत होते असाच अनुभव हजारो शेगाववासी सध्या अनुभवत आहे.
विदर्भ पंढरी म्हणून राज्यात प्रसिद्ध शेगाव नगरीत वर्षभर भक्ती व त्यागाचे प्रतीक असलेले भगवे ध्वज फडकत असतात. गजानन महाराज संस्थानच्या आषाढी वारी प्रस्थान असो की पंढरपूर येथून स्वगृही आगमन, संत गजानन महाराजांचा प्रगट दिन असो संपूर्ण शहरात संत नगरीत शेगांवमध्ये सर्वत्र भगवे ध्वज, पताका फडकताना दिसतात.
मात्र, या भगव्या उत्साहामध्ये आता देशभक्तीचा उत्साह वृद्धिंगत करणारा विशालकाय तिरंगा शामिल झाला आहे. जिल्ह्यात आकार व उंची या दोन्ही बाबतीत सर्वात मोठा असलेला राष्ट्रीय ध्वज शेगाव रेल्वे स्थानक परिसरात फडकविण्यात आला आहे. हा ध्वज स्तंभ १०० फूट उंचीचा आहे. ध्वजाचा आकार २० बाय ३० इतक्या आकाराचा आहे. हा विशाल राष्ट्रध्वज जिल्ह्यातील सर्वात उंच तिरंगा असावा, असे मानले जात आहे. याचा ध्वजारोहण सोहळा पार पडला तेंव्हा निळ्या आकाशात तिरंगा डोलताना पाहून नागरिकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
या भव्य ध्वजारोहण सोहळ्यात शेगाव रेल्वे स्थानकचे अधीक्षक, रेल्वे पोलीस दल, रेल्वे सुरक्षा बलाचे जवान, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकसाथ ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली. वाऱ्यासोबत लहरणारा तिरंगा पाहून परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.
रेल्वे स्थानक परिसरात उभारलेला हा ध्वज केवळ सौंदर्यवर्धन नाही तर शेगावच्या शिरपेचातील आणखी एक मानाचा तुरा आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा, ऐक्याचा आणि अभिमानाचा संदेश देणारा हा तिरंगा दूरवरून दररोज गजानन माउलीचे दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविक आणि पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे.