बुलढाणा: गणपती उत्सव म्हणजे कोकण प्रांतातील सर्वात मोठा सण आहे. मुंबई व उपनगरातील लाखो कोकणवासी अर्थात चाकरमानी गणेश उत्सवासाठी कोकणातील आपापल्या गावी आवर्जुन जातात. यंदाही ती परंपरा कायम आहे. आता या लाखो कोकणवासी भक्तांच्या गावी जाण्यासाठी व परतीच्या प्रवासासाठी उपलब्ध असलेली वाहन व्यवस्था तोकडी आहे. यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेसला पाचारण करण्यात आले आहे. अगदी दूरवरच्या बुलढाणा जिल्ह्यातील दहा,वीस नव्हे तब्बल ७३ बस कोकणवासीयांच्या सेवेसाठी घेण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील बुलढाणा व मेहकर बस आगारातील प्रत्येकी १५, चिखली व मलकापूर आगारातील प्रत्येकी १०, खामगाव व जळगाव जामोद आगारातील प्रत्येकी ८ तर शेगाव आगारातील ७ एसटी बसचा समावेश आहे. त्यातही ४२ आसनी परिवर्तन बस, त्याही स्थितीतील, गळक्या नसलेल्या बसेस महामंडळाच्या मुंबई विभागात पाठविण्याचे आदेश बुलढाणा विभागास देण्यात आले होते. तसेच प्रत्येकी २ बस मागे १ वाहक, तिकिटाचे मशीन पाठविण्याचे आदेश होते. त्यानुसार २३ ऑगस्टला ७३ बस पालघर विभागातील नाला सोपारा आगार येथे पाठविण्यात आल्या.

आधीच बुलढाणा जिल्ह्यातील बसेसचे वेळापत्रक अपुरे आहे. जिल्ह्याची लोकसंख्या, दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या, पन्नास टक्के सवलतीमुळे महिला प्रवाशांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेता रोज ३९० ते ३९५ दरम्यानचे शेड्युल अगोदरच अपुरे ठरते. त्यातच चांगल्या स्थितीतील बस कमी आणि भंगार स्थितीतील बसचा भरणा जास्त आहे. यातच विभागातील ७६ बस कोकणवासीयांच्या सेवेत गेल्यामुळे दैनिक वाहतुकीवर गंभीर परिणाम होणार व होत आहे. यामुळे रोजच्या फेऱ्या कमी होणार हे उघड आहे. परिणामी हजारो प्रवाशांची गैरसोय होत आहे. चालू महिन्यात २३ ऑगस्ट पासून हे चित्र असून सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे चित्र कायम राहणार आहे. यामुळे कोकणवासीयांची सेवा विदर्भातील बुलढाणा सारख्या जिल्ह्यासाठी गैरसोयीची ठरत आहे.