लोकसत्ता टीम

अमरावती: पाठ्यपुस्तके आणि वह्यांचे वाढते ओझे कमी करण्याच्या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने यंदाच्‍या शैक्षणिक वर्षात पाठ्य पुस्तकातच वह्यांची कोरी पाने समाविष्ट केली आहेत. त्यानुसार पुस्तकाचे चार भागात विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना सहा विषयांचे पाव भागांचे एकत्रित सुमारे दोनशे ते अडीचशे पानांचे पुस्तक आहे. या बदलामुळे विद्यार्थ्याचे दप्तराचे ओझे तर कमी झाले मात्र पालकांचा पुस्तकांचा खर्च २५ ते ३० टक्क्यांनी वाढला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वी २०० ते ३०० रुपयांपर्यंत पुस्तकांचा सेट बाजारात मिळायचा. मात्र हे एकच पुस्तक दोनशे रुपयांना आहे. पालकांना वर्षभरात अशी चार पुस्तके विकत घ्यायची आहेत. दप्‍तराचे ओझे वाढलेले आणि ग्रामीण भागातील मुलांना लिखाणाचे साहित्य उपलब्ध होत नाही, या दोन प्रतिकूल परिस्थितीवर उपाययोजना म्हणून पाठ्यपुस्तकातच वह्यांची पाने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिली ते आठवीपर्यंतची पुस्तके अशाच प्रकारे छापण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक महामंडळातर्फे छापण्यात येणाऱ्या सर्व पाठ्यपुस्तकांत हा बदल करण्यात आला. सर्व माध्यमांच्या सर्व विषयांच्या सेमी व इंग्रजी माध्यमांसह सर्व पुस्तकांत हा बदल आहे. बाजारात नुकतीच ही विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. या एकाच वर्षाच्या चार भागांच्या पुस्तकांच्या किमती २८० ते ६०० रुपयांपर्यंत आहेत. पूर्वीच्या तुलनेत यंदा किमती वाढल्याने पालकांना भुर्दंड बसत आहे. त्यामुळे नाराजीचा सूर आहे.