बुलढाणा : वर्षभर अध्यात्म अन संस्कृती जागर करणारी संतनगरी शेगाव नगरीत पवित्र वातावरण राहते. अशा विदर्भ पंढरी शेगाव परिसरात एका कंत्राटदाराचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. यामुळे ही आत्महत्या की सुनियोजित घातपात? असा प्रश्न शेगाव वासियांतून उपस्थित झाला आहे. तसेच अनेक तर्क वितर्क व्यक्त करण्यात येत आहे.

शेगाव परिसरात कंत्राटी कामे करणाऱ्या या ठेकेदारचा मृतदेह शेगाव तालुक्यातील जवळा फाट्याजवळ आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरा उघडकीस आली. शेगाव पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपास आणि चौकशीत मृत कंत्राटदाराचे नाव करण राजेश शर्मा (३०, रा. बाळापूर, जि. अकोला) असे असल्याचे निष्पन्न झाले. ते शेगाव परिसरात कंत्राटी कामे करीत होते. जवळा गावाजवळील रस्त्यावरील पुलालगत त्यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला. ही आत्महत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता नसून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

शेगावचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत करण शर्मा यांनी घरी (सुसाइड) नोट लिहून ठेवली असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र विस्तृत तपासाअंती संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल असेही उघड होईल, असेही ठाणेदार पाटील प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत बोलतांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. मृतदेहाचा शव विच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मृत्यूचे अचूक कारण समोर येणार आहे. या घटनेमुळे कंत्राटदार करण शर्मा यांचे मूळ गाव असलेल्या बाळा पूर गावातही खळबळ उडाली असून त्यांचे नातेवाईक शोकाकुल झाले आहे. या घटनेच्या तपासात काय खळबळजनक माहिती समोर येते याकडे शेगाव आणि बाळापूर वासियांचे लक्ष लागले आहे