लोकसत्ता टीम

अकोला : जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड मार्गावर बंद पडलेल्या कारखान्यात व्यावसायिक रमण चांडक यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले.

अकोट शहरापासून काही अंतरावर पोपटखेड मार्गावर बंद पडलेला कारखाना आहे. या कारखान्याच्या इमारतीमध्ये आज एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला. तो मृतदेह व्यावसायिक रमण चांडक यांचा असल्याचे निष्पन्न झाले.

रमण चांडक हे मूळचे अकोट तालुक्यातील पणज गावातील होते. ते गेल्या काही वर्षांपासून अकोला शहरातील गीता नगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होते. चांडक यांचा वाहन व मालमत्तेचा व्यवसाय होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा काहींशी आर्थिक व्यवहारांतून वाद सुरू असल्याची माहिती आहे.

या वादातूनच डोक्यात दगडाने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. हत्या प्रकरणाची माहिती मिळताच अकोट ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालायत पाठविण्यात आला. पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपीच्या मागावर विविध पथके रवाना केली आहेत.

पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून कसून चौकशी केली जात आहे. व्यावसायिकाच्या हत्येमागे नेमके कारण काय? असा प्रश्न निर्माण होत असून गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान अकोट ग्रामीण पोलिसांपुढे राहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

अकोट शहराजवळ पोपटखेड मार्गावर व्यावसायिकाची निर्घृण हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली. त्यातच जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. या सर्व प्रकरणावरून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्याची कसरत पोलिसांना करावी लागणार आहे. दरम्यान, शहरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २५ वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेस्थानक चौकातून मुलीला दुचाकीवरून नेत नराधम तरुणाने अत्याचार केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. दुसऱ्या एका प्रकरणात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला नराधमाने गर्भवती केले. महिलांची सुरक्षा देखील वाऱ्यावर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.