नागपूर: मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह शहर असलेल्या नागपुरात एका व्यापाऱ्याचे अपहरण झाले. त्यानंतर आरोपीकडून त्याला लाकडी दांड्याने मारहाणीचा व्हिडिओ तयार करून समाज माध्यमांवर टाकला गेला. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांनी दोन तासात व्यापाऱ्याची सुटका केली. या घटनेबाबत आपण जाणून घेऊ या.
शाहीद अली अमजद अली (३१) रा. ओमसाईनगर, कळमणा, नागपूर असे फिर्यादी असलेल्या व्यापारीचे नाव आहे. शाहीद अली अमजद अलीचा वाहन खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी आरोपी अफजल अहमद जावेद इकबाल (२९) आणि सय्यद अतीफ जोहर सय्यद नसीम जोहर (३२) यांच्याकडून ४ लाख रुपये उसने घेतले होते. या पैशांवरून वाद सुरू असताना २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० ते ९.३० या वेळेत आरोपींनी शाहीद अली यांना ‘पैशांबाबत बोलायचे आहे’ असे सांगून जबरदस्तीने दुचाकी वाहनावर बसवून शांतिनगर पुलियाकडे नेले.
दरम्यान शांतीनगर परिसरात आरोपी कामरान नकीब अशपाक अहमद (२९) हाही आला. येथे व्यापाऱ्याने कामरानकडे मदतीची विनंती केली. मात्र, आरोपी क्रमांक १ ते ३ यांनी फिर्यादीस मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना मोमिनपुरा येथील ‘दुल्हन’ नावाच्या कपड्यांच्या दुकानात नेऊन पुन्हा मारहाण केली. आरोपी जमाल अहमद जावेद इकबाल (२६) याने या मारहाणीचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला. त्यानंतर आरोपींनी लाकडी दांड्याने मारहाण करून पीडितास दुकानात डांबून ठेवले.
दरम्यान, कळमणा पोलिसांना पोलीस मदत कक्ष ११२ वरून याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फिर्यादीचा मोबाईल नंबर ट्रॅक केले. फिर्यादीची लोकेशन मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकून फिर्यादीची सुटका केली. ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सहआयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर आयुक्त राजेंद्र दाभाडे, उपआयुक्त निकेतन कदम व सहआयुक्त अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण काळे, शशिकांत मुसळे, ज्ञानेश्वर मोरे, संजय माने, विलास गमे, विशाल भैसारे, वसीम देसाई, ललित शेंडे, अविनाश चौव्हाण व अजय गटलेवा यांच्या पथकाने केली.
आरोपीकडून २.५० लाखांचा मुद्देमाल…
व्यापारीच्या या अपहरन प्रकरणात आरोपींवर पोलिसांनी गुन्हा नोंदवून अटक केली आहे. आरोपीकडून अपहरनासाठी वापरलेल्या दोन दुचाक्या, चार मोबाईल फोन, बेसबॉल स्टीक असा एकूण २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.