नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुनील केदार यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला न पाठिंबा देता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह सुमित मेंढे यांना साथ दिल्याने काँग्रेसमध्ये मोठे राजकीय वादळ उसळले आहे. बुटीबोरी नगर परिषद निवडणुकीत हा प्रकार घडला आहे.
काँग्रेसने नेहमी टीकेच्या केंद्रस्थानी ठेवलेल्या संघ परिवारातील व्यक्तीला केदार यांनी सार्वजनिकरित्या पाठिंबा दिल्याने अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. या गंभीर घडामोडीची नोंद घेत काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टणकर आणि माजी प्रदेश सचिव मुजीब पठाण यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली आहे. केदार यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
तक्रारीत आष्टणकर आणि पठाण यांनी स्पष्ट केले की, सुनील केदार यांच्या वाढत्या एकाधिकारशाहीमुळे काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अनेक वर्षे पक्षासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट नाकारत बाहेरच्या किंवा प्रतिस्पर्धी विचारसरणीच्या लोकांना प्राधान्य दिल्याचा आरोप त्यांनी केला.
कामठी, मौदा, रामटेक आणि वाड या महत्त्वाच्या तालुक्यांतील घटनांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. कामठीत माजी नगराध्यक्ष शहाजहाँ अंसारी यांना पुन्हा उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी (अजित गट)कडून उमेदवारी अर्ज दाखल केला. मौद्यात प्रदेश महासचिव राजा तिडके यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी घेतली. रामटेकमध्ये तालुका अध्यक्ष दामोधर थोपटे यांनाही अशीच स्थिती भोगावी लागली.
बुटीबोरीत मात्र परिस्थिती अधिकच विवादग्रस्त ठरली. काँग्रेससोबत कोणताही वैचारिक संबंध नसलेल्या आणि थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय पदाधिकारी असलेल्या सुमित मेंढे यांना केदारांनी पाठिंबा देताच काँग्रेसमध्ये खळबळ माजली. याचा पुरावा म्हणून मेंढे यांचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतचे विविध कार्यक्रमातील फोटो, तसेच संघाच्या पथसंचलनातील त्यांचा सहभाग हे सर्व दस्तऐवज स्वरूपात काँग्रेस नेतृत्वाला पाठविण्यात आले आहेत.
या सर्व घडामोडींमुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये रोष वाढला आहे. “केदार यांच्या निर्णयांमुळे काँग्रेसची विचारसरणी आणि कार्यप्रणाली धोक्यात येत असून, संघाकडे पक्ष झुकत असल्याची छाप पडत आहे,” असे आष्टणकर, पठाण यांच्यासह कुणाल भगत, नासीर शेख, नागेश गिरे, योगेश हलवले, शफी शेख, प्रीतम निंबाळक, शेख तौसिफ यांनी म्हटले. त्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठीने त्वरित हस्तक्षेप करून केदार यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
