नागपूर : तत्कालिन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यकाळात विमानांच्या खरेदीबाबत लेखा व परीक्षण अहवालात आक्षेप घेण्यात आले होते. त्यावेळी खरेदी झालेल्या विमानांपैकी एक विमान अहमदाबादेत दुर्घटनाग्रस्त झाले. केंद्र सरकारने या अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
अहमदाबाद येथे झालेल्या विमानाची खरेदी २०११-१२ मध्ये झाली. कॅगने या खरेदीत गडबड असल्याचा ठपका ठेवला होता. कॅगच्या अहवालात प्रफुल्ल पटेल यांच्यावर ताशेरे ओढण्यात आले होते. आता पटेल हे मोदी सरकारसोबत आहेत. विमान अपघाताची जबाबादारी सरकारने घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
पटोले नागपूर पत्रकार क्लब येथे शुक्रवारी बोलत होते. काँग्रेस सरकारच्या काळात रेल्वे अपघात किंवा इतर दुर्घटना घडल्यास राजीनामा मागणारे भाजपचे नेते देशात विमान, हेलिकॉप्टर, रेल्वे, रस्ता अपघात शेकडो लोकांचे प्राण जात आहे. परंतु त्यांची जबाबदारी घेण्यास तयार नाही, असेही ते म्हणाले.
मतांची चोरी लपवण्यासाठी नियमात बदल
मतांची चोरी लपावी म्हणून सीसीटीव्ही फुटेज उमेदवारांना उपलब्ध करून देणारा निवडणूक आयोगाच्या नियम क्रमांक ९३ मध्ये बदल करण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून ४५ दिवसांनंतर निवडणूक प्रक्रियेचे संपूर्ण फुटेज नष्ट करण्याचे निर्देश दिले आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. ते म्हणाले, हरियाणा राज्यातील निवडणुकीत गडबड झाल्याचे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेचे सर्व सीसीटीव्ही फुटेज संबंधितांना उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
या निर्णयामुळे मतांची चोरी उघडकीस येईल म्हणून ही बाब निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला कळवली. उच्च न्यायालयाच्या निकालास ४८ तास होत नाही तोच केंद्र सरकारने नियम क्रमांक ९३ मध्ये बदल केला. केंद्र सरकारने निवडणूक आचारसंहितेत बदल करून निवडणुकीची काही कागदपत्रे सार्वजनिक न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कॅमेरा आणि वेबकास्टींग फुटेज सार्वजनिक करण्यास मनाई करण्यात येत आहे. अशाप्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रातील सरकार आणि निवडणूक आयोगाने लोकशाहीची थट्टा चालवली आहे. मतांची चोरी करायची आणि ती लपवण्याची व्यवस्था केली आहे, असेही ते म्हणाले.
राज- फडणवीस मॅच फिक्सिंग
हिंदी भाषेचा मुद्दा देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांची स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मॅच फिक्सिंग आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. राज्यात चालेला भष्ट्राचार, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, वाढलेली महागाई, लाडक्या बहिणींना देण्यास पैसा नसणे आदी मुद्दे चर्चेले जाऊ नये म्हणून मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण करून मतांचे विभाजन करण्याचा प्रयत्न या दोघांचा आहे, असेही पटोले म्हणाले.