नागपूर: बारावीनंतर अभियांत्रिकी शाखेकडे विद्यार्थ्यांचा वाढता ओढा आहे. मात्र यासाठी भरमसाठ फी देऊनही हव्या त्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळेल का नाही याची चिंता विद्यार्थी आणि पालकांना सातत्याने भेडसावत असते. त्यानंतरही चांगली नोकरी मिळेल का याचीही काळजी सतावत असते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मोफत अभियांत्रिकी शिक्षण, शिवाय निवास, भोजन, पुस्तके व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मानाची आणि दोन लाखांपासून ते पाच लाख रुपये महिना पगाराची नोकरी निश्चित देऊ शकणारे महाविद्यालय भारतात आहे यावर कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र, हे खरे आहे.
अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये शिक्षण घेऊन विद्यार्थी वार्षिक ६४ लाख रुपयांचे पॅकेज मिळवत आहेत. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (व्हीएनआयटी) यावर्षी झालेल्या ‘कॅम्पस प्लेसमेंट’मध्ये देशभरातील नामवंत संस्थांनी भाग घेतला होता. यामधून ७२७ विद्यार्थ्यांची जागतिक दर्जाच्या नामवंत संस्थांमध्ये निवड झाली असून अंतिम वर्षाच्या एका विद्यार्थ्याची तब्बल ६४ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली आहे. ओरॅकल इंडिया प्रा. लि. कंपनीने त्याची निवड केली.
व्हीएनआयटीच्या वतीने दरवर्षी ‘कॅम्पस प्लेसमेंट’चे आयोजन केले जाते. २०२३ मध्ये एका प्रसिद्ध आयटी कंपनीच्या उत्पादन विभागात १४ बी.टेक. विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात आली होती. त्यावेळी सर्वाेच्च ६४ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर विद्यार्थ्याची निवड झाली होती. यावेळी १,२५० विद्यार्थ्यांपैकी ९३६ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली होती. बी.टेक. विद्यार्थ्यांसाठी सरासरी ११.८ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर निवड झाली होती. यावर्षी २०२४च्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट घेण्यात आले असून यामध्ये जगभरातील १५८ कंपन्यांनी व ७७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी ७२७ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. या विद्यार्थ्यांना सरासरी १५ लाखांच्या वर वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
सर्वाधिक पॅकेज ६४ लाख रुपये मिळाले आहे. त्यामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये डीई शॉ, गुगल, यूएसआय कन्सल्टिंग, सायमन, जे.पी. मॉर्गन चार यासारख्या नामवंत संस्थांचा समावेश होता.
शैक्षणिक वर्ष – प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या – सरासरी पॅकेज
२०१९-२० – ४९८ – ८.५ लाख
२०२०-२१- ४९९ – ८.४ लाख.
२०२१-२२ – ६६९ – ११ लाख.
२०२२-२३ – ६७० – ११.९२ लाख