बुलढाणा: लोकार्पणपासून विविध कारणांनी प्रामुख्याने लहान मोठ्या अपघातांच्या घटनानी हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी दृतगती मार्ग गाजत आला आहे. ठराविक अंतराने होणारे वाहन अपघात म्हणजे समृद्धी मार्गासाठी नित्याचीच बाब ठरली आहे. काल सोमवारची रात्र सुद्धा एका दुर्देवी अपघाताची साक्षीदार ठरली. दहा नोव्हेंबरच्या रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. यात भरधाव कार समोरून जाणाऱ्या मालवाहू वाहनावर (ट्रकवर) आदळली. यामुळे एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात समृद्धी महामार्गावर फरदापुर उपकेंद्र हद्दीत १० झाला.

महामार्ग पोलीस उपकेंद्र फरदापुरच्या माहितीनुसार, चेनेल क्रमांक २९८.०१ या ठिकाणी नागपूर दिशेने जाणारी स्कार्पिओ (एम एच ३१ जिए ६०९१ क्रमांकची) कार समोरील ट्रक (एम एच ४३ बीपी ७१८५) ला मागून धडकली. या अपघातात नावेद शामिया अब्बास (वय ४५, रा. नागपूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालक बिलाल जफर अब्बास (वय ३८, रा. नागपूर) हा गंभीर जखमी झाला आहे.

घटनास्थळी महामार्ग पोलीस उपकेंद्र फरदापुरचे पोलीस उप निरीक्षक जितेंद्र राऊत, पोलीस हवालदार, जमादार हे तात्काळ दाखल झाले. त्यांनी मृत आणि जखमींना रुग्ण वाहिकेतून नजिकच्या रुग्णालयात हलविले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

या अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातस्थळी मेहकर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हजर होते. पुढील तपास महामार्ग पोलीस उपकेंद्र फरदापुर येथील पीएसआय जितेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.