परिवहन समिती कक्षातून नजर ठेवणार; महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

नागपूर : महापालिका परिवहन विभागाच्या माध्यमातून संचालित होणाऱ्या  सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. तसे  निर्देश परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी दिले आहेत.

कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. याबाबत माहिती देताना कुकडे म्हणाले, शहर बस वाहतुकीत महिलांच्या सुरक्षेला यापुढेही प्राधान्य देण्यात येईल. महिलांसाठी असलेल्या विशेष बसव्यतिरिक्त अन्य बसेसमध्येही महिला मोठय़ा संख्येने प्रवास करतात. त्यामुळे या बसेसमध्येही महिला सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही लावणे अत्यावश्यक आहे. परिवहन समिती कक्षातून या सर्व बसेसवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवण्यात यावी, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

शहर बस सेवेसाठी असलेल्या प्रत्येक आगाराची मोका तपासणी करून तेथे आवश्यक आणि गरजेच्या असलेल्या सर्व बाबींचा अहवाल तयार करून त्या तातडीने पूर्ण करा, पारडी येथील पास केंद्र त्वरित सुरू करा, असे निर्देश यावेळी देण्यात आले. शिवाय  कामचुकार  कर्मचाऱ्यांची  हकालपट्टी करून नव्याने नियुक्ती केली जाणार आहे. मोरभवन बसस्थानकात अनेक प्रवासी बसच्या प्रतीक्षेत उभे असतात. त्यांना बसण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही. तेथे प्रतीक्षालय अथवा खुच्र्याची व्यवस्था केली जाणार आहे.

तिजोरी रिकामी, तरीही अभ्यास दौरा

शहरातील परिवहन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत.  मुंबई, इंदोर अशा मोठय़ा शहरातील शहर बसव्यवस्थेमध्ये काय नव्या बाबी आहेत, लोकहितासाठी, प्रवाशांसाठी काही नवे प्रयोग राबलिे जातात का, याचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेची परिवहन समिती दौरा करणार आहे. आधीच परिवहन विभागाची आर्थिक स्थिती चांगली नसताना आता अभ्यास करण्यासाठी दौरा आयोजित केला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.