नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेंशन सेंटर येथे इंडियन बिल्डिंग काँग्रेसच्या वार्षिक परिषदेतही त्यांनी सरकारी कामाच्या पद्धतीचा एक किस्सा सांगितला. त्यात गडकरी म्हणाले, ” आपल्याकडे जर वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले, तर आपणही घोडाच म्हणायचे का? असा सवाल त्यांनी केला.”. गडकरी नेमके काय म्हणाले? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात मंचावर याप्रसंगी मंचावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजे, आयबीसीचे अध्यक्ष सी देबनाथ, आय. बी. सी. राज्य अध्यक्ष सुभाष चांदसुरे, आय.बी. सी.चे राष्ट्रीय अध्यक्ष चिन्मय देबनाथ, व्ही.आर. बन्सल, सचिव व्ही.आर. बन्सल, उपाध्यक्ष अविनाश गुल्हाने उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, मलेशियातील इंजिनियर्सने दोन पिल्लर मधील अंतर वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणले. त्यात स्टिल फायबरच्या मटेरियलचे बीम वापरल्यास त्यातील अंतर १२० मीटरपर्यंत वाढवण्याचे तंत्रज्ञान आहे. हे करतांना आम्हाला चांगलाच त्रास झाला. परंतु आपल्याकडे चुकीचे व कालबाह्य तंत्रज्ञान असल्यावरही सरकारी पद्धतीने ते असेच वापरावे, असे सांगण्यात येते.
सरकारी पद्धतीत आजूृ- बाजूला बघायचे नाही, वरिष्ठ बोलतात तसेच करण्याची आहे. वरिष्ठांनी गाढवाला घोडा म्हटल्यास, आपणही घोडाच म्हणायचे अशी पद्धत असल्याचेही गडकरी म्हणाले राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे बांधलेल्या मुंबईतील सह्याद्री अतिगृहातील कामाची मात्र गडकरींनी प्रशंसा केली. गडकरी म्हणाले, ताजमहल सदृष्य सुंदर वास्तू मुंबईत सह्याद्री अतिगृहाच्या रुपात बांधली गेली आहे. आजही ही इमारत मुंबईतील चांगल्या वास्तूपैकी एक आहे. विकसीत भारतासाठी या पद्धतीच्या चांगल्या वास्तू व्हायला हव्या, असेही गडकरी म्हणाले.
स्वच्छता गृहातील पाणी इमारत व रस्ते बांधकामासाठी
नागपुरात स्वच्छता गृहाचे घान पाणीचे शुद्धीकरण केले जाते. हे पाणी महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राला विकून नागपूर महापालिकेला वर्षाला ३०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आता या पाण्याचा दर्जासह इतरही तपासणी प्रयोगशाळेत केली जात आहे. त्यातील निरीक्षणानंतर हे पाणी नागपुरातील निर्माणाधीन रस्ते व इमारतीसाठी वापरणे शक्य आहे काय? त्याबाबत चाचपणी सुरू असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
रस्ते वळणाच्या दोषामुळे ‘ट्रोलिंग’
हल्ली लहान-सहान गोष्टींमुळे आम्हाला समाज माध्यमांवर ट्रोल केले जाते. एनएचआय आणि स्टेट पीडब्लूडीकडून मोठ मोठे रस्ते व पूल तयार केले जातात. परंतु येथील डायव्हर्शन रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीसह इतर समस्या बघायला मिळतात. आमच्या एनएचआयच्या एका अधिकाऱ्याला त्याबाबत विचारणा केल्यावर त्याने सरकारच्या रस्ते व डायव्हरर्शनबाबतच्या जीआरची माहिती दिली. त्यावर मी सुधारणा करण्यास सांगितले. मुंबई- गोवा महामार्गावरील डायव्हर्शनबाबत मी समाज माध्यमावर खूप शिव्या खाल्याचेही गडकरी म्हणाले.