नागपूर : शहराचा जुना आणि दाटीवाटीचा भाग असलेल्या मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे सहा प्रभाग असून २२ पैकी १५ भाजपचे तर सात नगरसेवक काँग्रेसचे आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपविरुद्ध काँग्रेस अशी अतिशय चुरशी लढत होणाऱ्या या मतदारसंघात दोन्ही पक्षांना समान संधी आहेत.

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जातीय ध्रुविकरण बघावयास मिळते. त्यातून गेल्या काही विधानसभा निवडणुकीत भाजप सरस ठरत आहे. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत देखील भाजपने या मतदारसंघात काँग्रेसपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणले होते. जातीय समीकरणावर अवलंबून असलेल्या या मतदारसंघात २०२४ मध्ये भाजपचे प्रवीण दटके यांचा ११,५१६ मतांनी विजय झाला. दटके यांना ९० हजार ५६० मते आणि बंटी शेळके यांना ७८ हजार ९२८ मते मिळाली होती.

अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर जे आता काँग्रेसमध्ये आहेत. त्यांनी २३ हजार ३०२ मते प्राप्त केली होती. २०१९ पेक्षा २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढली आणि भाजपच्या विजयाचे अंतर देखील वाढल्याचे दिसून येते. त्यापूर्वी म्हणजे २०१९ मध्ये भाजपचे विकास कुंभारे यांनी काँग्रेसचे बंटी शेळके यांचा केवळ ४ हजार मतांनी पराभव केला होता.

या मतदारसंघात ८, १७, १८, १९, २० आणि २२ असे सहा प्रभाग आहेत. यापैकी प्रभाग १७ चा अधिक भाग दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये सर्व चारही नगरसेवक काँग्रेसचे आहेत. मोमीनपुरा आणि आजबाजूबाजूच्या वसाहतींचा समावेश या प्रभागात होतो.

प्रभाग क्रमांक १७ मध्ये रामबाग, इमामवाडा, उंटखाना हा भाग दक्षिण-पश्चिममध्ये येतो. गणेशपेठ आणि त्याच्या बाजूच्या वसाहती मिळून एकूण सात बुथ आहेत. प्रभाग क्रमांक १८ हा महालचा भाग आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेला हा प्रभाग आहे. या प्रभागात तीन भाजपचे तर एक नगरसेवक काँग्रेसचा आहे.

प्रभाग क्रमांक १९ मध्ये चारही नगरसेवक भाजपचे आहेत. प्रभाग क्रमांक २० म्हणजे गोळीबार चौक, बांगलादेशचा भाग आहे. या प्रभागात तीन भाजप आणि एक काँग्रेसचा नगरसेवक आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये जुनी मंगळवारी, जुना मोटार स्टँड, इतवारी, शहीद चौकापर्यंतचा भाग आहे. या प्रभागात काही वसाहती पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. येथे सर्व नगरसेवक भाजपचे आहेत.