अमरावती : मध्य रेल्वेवरून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात प्रवासी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करीत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन मध्य रेल्वेने आता विनातिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी कंबर कसली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील आठ रेल्वे स्थानकांवर विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. बुधवारी एका दिवशी सुमारे ३९४ प्रवाशांना पकडून २ लाख ९१ हजार ६४० रुपये दंड वसूल करण्यात आला.
या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत ७३ तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) १० कर्मचारी सहभागी झाले होते. या मोहिमेत रेल्वेच्या हद्दीत व्यवसाय करणाऱ्या चार अनधिकृत विक्रेत्यांवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान अनेक प्रवासी नियमबाह्य पद्धतीने प्रवास करताना आढळले. त्यात विनातिकीट प्रवास करणे, आरक्षित डब्यातून चुकीच्या तिकिटावर प्रवास करणे, जादा सामान स्वत:जवळ बाळगणे आदी प्रकरणी कारवाई करण्यात आली. रेल्वे कायदा कलम १४५(ब) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
प्रवाशांना सुरक्षित, सुकर व आरामदायक प्रवासाची सुविधा देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, रेल्वे नियमितपणे मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष ट्रेनसह व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबवत असते. फुकट्या प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कारवाईची मोहीम राबवावी लागते. स्थानक तपासणी, अचानक धाड तपासणी, किल्लाबंदी तपासणी, व्यापक तपासणी व मेगा तिकीट तपासणी मोहिमांचा यात समावेश आहे.
भुसावळ विभाग क्रमांक एकवर
मध्य रेल्वेने एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत तिकीट तपासणीत विनातिकीट १४.४३ लाख प्रवाशांना पकडले असून त्यांच्याकडून एकूण ८६.७३ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमध्ये भुसावळ विभाग अव्वल आहे. भुसावळ विभागात ३.८५ लाख प्रवाशांकडून ३३.४९ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
विशेष तिकीट मोहिमेदरम्यान तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांसह वाणिज्य अधिकारी आणि विभागीय कार्यालयातील वरिष्ठ पर्यवेक्षकांचे पथक, आवश्यकतेनुसार आरपीएफ, दक्षत आणि इतर विभागांतील कर्मचाऱ्यांना पाचारण करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाकडून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
पीआरएस तिकिटांच्या तपासणीदरम्यान प्रवाशांचे ओळखपत्र तपासणे, सवलतीचे तिकीट असल्यास त्याबाबतचा वैध पुरावा तपासून घ्यावा, आरक्षण केंद्रावर दलालाच्या हालचाली रोखण्यासाठी पथके तयार करून तपासण्या कराव्यात. तसेच आपत्कालीन कोट्याचा गैरवापर होऊ नये, याबाबत सतर्क रहावे, अनधिकृत विक्रेत्यांना रेल्वेगाड्यांमध्ये बंदी घालावी, अशा सूचना रेल्वे मंडळाने दिल्या आहेत.