यवतमाळ : काश्मीरमध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली. देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १५ दिवसांत देश सोडण्याचे आदेश गृह मंत्रालयाने दिले. त्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील पाकिस्तानी नागरिकांचा शोध प्रशासनाने घेतला, तेव्हा जिल्ह्यात १४ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य आढळून आले. यातील १० नागरिक हिंदू असून, चार मुस्लीम आहेत.
दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करत २७ पर्यटकांना धर्म विचारत गोळ्या घालून ठार केले. या घटनेने संपूर्ण देशभरातून पाकिस्तान विरोधात रोष व्यक्त होत आहे. या घटनेनंतर केंद्र सरकारने भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे फर्मान दिले. यवतमाळ जिल्ह्यात असे १४ नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती या घटनेनंतर मिळाली. पोलीस विभागाने या चौदाही नागरिकांच्या कागदपत्रांची छाननी व पडताळणी केली. यात १० नागरिक हिंदू (सिंधी समाज) तर चार नागरिक मुस्लीम आहेत. या सर्वांकडे दीर्घकालीन वास्तव्याचा व्हिसा आहे. हे सर्वजण गत ५०-६० वर्षांपासून भारतात यवतमाळ येथे वास्तव्यास आहेत. यातील अनेक नागरिकांनी आता भारतातील वास्तव्याचे राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळावे म्हणून मागणी केली आहे.
यासंदर्भात माध्यमांशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी १४ पाकिस्तानी राष्ट्रीयत्व असलेले नागरिक यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्यास असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे दीर्घकालीन व्हिसा असल्याने शासनाने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासंदर्भात दिलेल्या सूचना या नागरिकांना लागू होणार नाहीत. शासनाच्या सूचनांनुसार जे पाकिस्तानी नागरिक मेडिकल व्हिसा, टुरिस्ट व्हिसा किंवा बिझनेस व्हिसा घेवून तात्पूरत्या वास्तव्यासाठी भारतात आले त्यांनी देश सोडून जावे, असे आदेश आहेत. यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्यास असलेले सर्व १४ नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून येथे राहत आहेत. त्यांच्याकडे दीर्घकालीन वास्तव्याचा व्हिसा आहे. त्यांनी राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासाठीही अर्ज केले असून, ती प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडून जाण्यासंदर्भात केंद्र सरकारने दिलेले आदेश या नागरिकांवर लागू होणार नाही, असे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या आदेशानंतर जिल्ह्यातील पाकिस्तानी नागरिकांमध्ये अस्वस्थता परसली होती. मात्र यातील अनेकजण यवतमाळ जिल्ह्यात विविध व्यवसायात रूळले आहेत. त्यांचे कुटुंब येथे आहे. केंद्र शासनाच्या सूचना तात्पूरत्या व्हिसावर राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांसाठी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या कुटुंबांनी सुटकेचा श्वास सोडला.
उमरखेडमध्ये पाकिस्तानची अंत्ययात्रा
पहलगाम हल्ल्याच्या निषधार्त उमरखेड शहरात सर्व राजकीय पक्षांसह विविध सामाजिक संघटनांकडून निषेध मोर्चा काढण्यात येवून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी सर्वपक्षीयांच्या वतीने नाग चौक ते संजय गांधी चौकापर्यंत पाकिस्तानची अंत्ययात्रा काढत संजय गांधी चौकात पुतळ्याचे दहन करण्यात आले. तर सुन्नी स्टूडेंट फेडरेशन या सामाजिक संघटनेच्या वतीने शहरातील मुस्लीम युवकांनी पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्त कँडल मार्च काढला. या वेळी ‘आतंकवाद मुर्दाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या.