चंद्रपूर : मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे बंधू हरिशचंद्र अहीर यांचा मुलगा महेश अहीर आणि त्याचा मित्र हरीश धोेटे या दोन तरुणांचे मृतदेह पंजाबची राजधानी चंदीगड येथील कजेहडी गावाजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. हेही वाचा >>> नागपूर : घरावर भाजपचा फलक लावा, फडणवीस यांची बुथ प्रमुखांना सूचना महेश आणि हरीश बेपत्ता असल्याची तक्रार सात दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आज, बुधवारी या दोन्ही युवकांचे मृतदेह चंदीगड येथील कजेहडी गावाजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आले. चंदीगड पोलिसांनी यासंदर्भात चंद्रपूर पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. चंदीगड पोलिसांनी आत्महत्येचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. परंतु, चंद्रपुरातील दोन युवक चंदीगड येथे जाऊन आत्महत्या का करतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता, सात दिवसांपूर्वीच दोन्ही मुले बेपत्ता असल्याची तक्रार मिळाली होती. चंद्रपूर पोलीस चंदीगड येथे तपासासाठी निघाले होते. मात्र, आज दुपारी चंदीगड पोलिसांचाच फोन आला, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, ही आत्महत्या की हत्या, याबाबत अजूनही साशंकता आहे.