गडचिरोली : लोह खनिजावर आधारित उद्योगांमुळे जिल्ह्याची ओळख बदलत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होत आहे. विमानतळ उभारण्यात येणार आहे. परंतु यासाठी जर आमची सुपीक शेतजमीन सरकार घेणार असेल तर आम्ही कुठे जायचे, असा प्रश्न चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. या परिसरात ‘एमआयडीसी’करिता प्रशासन मोठ्या प्रमाणात भूसंपादन करणार आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया देखील सुरु करण्यात आल्याने बारमाही शेती करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष पाहायला मिळत आहे.
एकेकाळी दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोह खनिजांच्या साठ्यामुळे मोठमोठे उद्यागपती लाखो कोटींची गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लोहखनिजावर आधारित उद्योग निर्मितीला वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यातील कोनसरीलगत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तब्बल ९६३ हेक्टर जागेची मागणी केली आहे. यासाठी प्रशासनाने परिसरातील मुधोलीचक २, जयरामपूर, पारडीदेव, सोमनपल्ली, कोनसरी, मुधोली तुकुम या ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी नोटीस पाठवली आहे. यातील काहींच्या जमिनी थेट खरेदी करण्याची प्रक्रिया देखील सुरु आहे. भेंडाळा परिसरातील जवळपास पंधरा गावातील शेत जमीन सुद्धा अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, शेजारी बारमाही वाहणाऱ्या नदीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक सुपीक शेत जमीन या भागात आहे. त्यामुळे शेतजमीन देण्यास येथील शेतकरी तयार नाही. याविरोधात एकत्र येत शेतकऱ्यांनी दोनवेळा मोठे आंदोलन केले. गावात जमीन मोजणीसाठी आलेल्या महसुलच्या अधिकाऱ्यांना हाकलून लावले. प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जमीन अधिग्रहण करण्यासाठी नोटीस पाठविल्याने शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. जयरामपूर, मुधोलीचक क्रमांक २ गावात तर जमिनीच्या संदर्भात कुणीही येऊ नये असे फलक लावण्यात आले होते. वर्षातून तीनदा उत्पन्न घेणारे सधन शेतकरी या भागात आहेत. त्यामुळे कित्येक पिढ्यांचे पोट भरणाऱ्या शेतजमिनी प्रकल्पांसाठी दिल्यास आम्ही कुठे जायचे, असा सवाल ते उपस्थित करीत आहे.
विमानतळ वादात
जिल्हा मुख्यालयालगत विमानतळ उभारणीसाठी तीन ग्रामपंचायतींनी विराेध दर्शविला आहे. याचीच री ग्रामपंचायत मुडझा बु. व मुडझा तुकूम येथील शेतकऱ्यांनी ओढली. सुपीक जमिनीवर विमानतळ विकसित करण्यासाठी भूसंपादनाकरिता शेतजमिनी देण्यास ग्रामसभेने विराेध दर्शविला असून याबाबतचा ठराव नुकताच ठराव घेण्यात आला होता. त्यानंतरही प्रशासनाने थेट जमिनी खरेदी करण्याचे पत्र काढले आहे. याविरोधात मूरखळा येथे शरद ब्राह्मणवाडे यांनी उपोषण देखील सुरू केले आहे.
लाखो कोटींची गुंतवणूक
सूरजागड टेकडीवर उत्खनन करणाऱ्या लॉयड मेटल्स कंपनीचा कारखाना कोनसरी येथे उभा उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. सोबतच जिंदाल, मित्तल, वेदांता सारख्या कंपन्यांनी १ लाख कोटीहून अधिक गुंतवणुकीची घोषणा केली आहे. पण यासाठी जमीन कुठून आणणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जिल्ह्यात ७५ टक्के जंगल आहे. खासगी भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. एवढेच गरजेचे असेल तर शासनाने कायद्यात बदल करून वनजमिन उद्योगांसाठी द्यावी असेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे भविष्यात प्रशासन विरुद्ध शेतकरी असा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.