नागपूर : राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर ओसरला असला तरीही सोमवारी काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर बुधवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली असून विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढला होता. जुलै च्या अखेरीस पावसाने जवळजवळ विश्रांती घेतली होती. मात्र, आता हवामानात पुन्हा बदल जाणवत असून सोमवारी राज्यातील दहा जिल्ह्यांना हवामान खात्याने “यलो अलर्ट” दिला आहे. ११ ऑगस्टला कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि घाटमाथा परिसर या सर्व जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. सोलापूरला पावसाचा “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली या जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाने “यलो अलर्ट” दिला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या सहा जिल्ह्यांना पावसाचा “यलो अलर्ट” जारी करण्यात आला आहे. तर अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, वाशीम या जिल्ह्यांत कुठलीही पावसाची शक्यता नाही. मात्र, १३ ऑगस्टपासून विदर्भात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या दोन दिवसात गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट तर इतर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे.