चंद्रपूर : मॅगेसेस पुरस्कार विजेते, ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे व साधना आमटे यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या ‘आनंदवन’ने २१ जून रोजी पंचाहत्तरीत म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. आनंदवनाचे हे अमृत महोत्सवी वर्ष सेवा वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय आनंदवन परिवाराने घेतला आहे. आनंदवनचे विश्वस्त तथा बाबा आमटे यांचे नातू कौस्तूभ आमटे यांनी ही घोषणा केली.

आजपासून ७५ वर्षांपूर्वी वरोराजवळील एका ओसाड, दगडांनी भरलेल्या जमिनीवर, जिथे मातीनेही सुगंध दरवळण्याची आशा सोडली होती, अशा ओसाड निर्जनस्थळी बाबा आमटे यांनी आनंदवन हे कुष्ठरूग्णांचे नंदनवन वसवले. त्यावेळी त्यांच्याकडे १४ वर्षांची मुलगी, एक जखमी गाय, मूलभूत अवजारे, त्यांची पत्नी साधनाताई, दोन लहान मुले आणि सहा कुष्ठरोगी होते. बाबांसोबत माती मळणाऱ्या प्रत्येक हाताने, खंबीरपणे उभे राहिलेल्या प्रत्येक पायाने आणि स्वप्नाला पाणी देणाऱ्या प्रत्येक अश्रूने महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून आनंदवन जन्माला घातले. आज बघता बघता आनंदवनाने ७५ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंदवनाला आकार देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक संघर्षाला, प्रत्येक क्षणाला आम्ही हृदयात साठवून ठेवले आहे, अशी भावना आमटे कुटुंबीयांनी व्यक्त केली. अमृत महोत्सवी वर्ष हे सेवा वर्ष म्हणून साजरे होणार आहे. या सेवा कार्यात आनंदवन मित्र परिवारातील सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कौस्तूभ आमटे यांनी केले आहे.