चंद्रपूर : माजी वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात सामावून घ्यावे, अशी विनंती करीत राजुराचे आमदार देवराव भोंगळे तथा जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या द्वारी पोहचले. यावेळी मुनगंटीवार समर्थकांनी हा जिल्ह्यावर अन्याय आहे. तेव्हा मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना केली.

माजी वन मंत्री तथा विदर्भातून सलग सात विधानसभा निवडणुकीत विजय संपादन करून विक्रम करणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने जिल्ह्यात सर्वत्र नाराजीचा सूर उमटला आहे. भाजप पदाधिकारी तसेच चंद्रपूरची जनता समाज माध्यमांवर व्यक्त होत आहे. चंद्रपुरात ठिकठिकाणी मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ फलक झळकत आहे.

हेही वाचा : रायगड आणि शिवनेरीवर आता भगवा ध्वज….खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सभागृहात….

अशातच आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांनी फडणवीस यांची सोमवारला रात्री दहा वाजता भेट घेतली. तत्पूर्वी पक्ष कार्यालयात या पदाधिकाऱ्यांनी मुनगंटीवार यांची भेट घेतली. त्यावेळी सारेच गहिरवले. मुनगंटीवार यांच्यामुळे जिल्ह्यातील विकास कामे थांबणार. कार्यकर्ते पदाधिकारी नाराज आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात सामावून घ्या, अशी विनंती फडणवीस यांच्याकडे केली. फडणवीस यांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकूण घेतले. सुधीरभाऊंना का वगळण्यात आले, याची माहिती दिल्लीतून घेतो, असे सांगून या पदाधिकाऱ्यांची समजूत काढली आणि बैठक संपली.

यावेळी माजी आमदार अतुल देशकर, चंदनसिंह चंदेल, भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, महिला आघाडी प्रमुख सविता कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येत पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान येत्या १९ तारखेला मुनगंटीवार दिल्ली येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : तालिका सभाध्यक्षांच्या निवडीत काँग्रेस, राष्ट्रवादीला डावलले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागपुरात काम झाले तर ठिक अन्यथा….

मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात सामावून घ्या, यासाठी त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहे. चंद्रपूरातून पदयात्रा करीत काही समर्थक आज मंगळवारला नागपूरच्या दिशेने रवाना झाले. यात फारुख शेख, हरीश व्यवहारे, सुरज पारखी, अमित तामटकर, अरविंद बोरकर, देवानंद थोरात, भोजराज शिंदे, मनोज ठेंगणे, दीपक सिंग आदी कार्यकर्ते चंद्रपुरातून निघाले आहेत. तिथे मुख्यमंत्र्यांची भेट घेवू. काम झाले तर ठिक अन्यथा दिल्लीला पोहचू, असा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला आहे. सुधीरभाऊ आम्ही तुमच्या सोबत, आम्ही चंद्रपूरकर असे फलक शहरात जागोजागी लागले आहे.