चंद्रपूर : घरकुलधारकांना वाळू मिळत नसल्याने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. मात्र खनिज चोरीत भाजपचेच नेते आघाडीवर असल्याचे चित्र आहे. भाजपचे तालुका महामंत्री खनिज चोरीत अडकल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हातील हिवरा गावाचे सरपंच आणि भाजपचे महामंत्री निलेश गिरमा पुलगमकार यांच्या मालकीचे ट्रॅक्टर महसूल विभागाने जप्त केले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा हे गाव राजुरा विधानसभा मतदारसंघात मोडत असून येथे खनिज चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

जिल्ह्यातील विकासकामांना सध्या गती आली आहे. विकासकामांसाठी लागणाऱ्या खनिजाची चोरी दिवसरात्र सुरू आहे. गोंडपिपरी तालुक्यातील लिखितवाडा वाळू घाटातून नियमबाह्य वाळूचा उपसा सुरू असतानाही महसूल विभागाने अद्याप कुठलीच कारवाई केलेली नाही. या वाळू तस्करीत राजुराऱ्यातील भाजप नेत्याच्या नातेवाईकाचा समावेश असल्याची चर्चा आहे. अशातच भाजपचे तालुका महामंत्री निलेश पुलगमकार मुरूम चोरीत अडकले आहे. ते स्वतःच्या मालकीच्या ट्रॅक्टरने मुरूम चोरी करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. वेडगाव येथील तलाठी विकास चोपडे यांनी रविवारी घटनास्थळ गाठून मुरमांनी भरलेले ट्रॅक्टर जप्त केले.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खनिजाची चोरी सुरू आहे. यावर भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे आहेत. त्यांचा क्षेत्रात येणारा गोंडपिपरी तालुका खनिज चोरीचे मुख्य केंद्र झाले आहे.

शासकीय खनिकर्म विभागाच्या ट्रकद्वारे अवैद्य वाळू वाहतूक

शासकीय खनिकर्म विभागाच्या ट्रकमधून वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती काही जागरूक नागरिकांनी नायब तहसीलदारांना दिली. महसूल विभागाचे गस्त पथक तेथे आले. पंचनामा करून ट्रक जप्त न करता तेथेच ठेवला. नंतर तो ट्रक चालकाने तिथून पसार केला. याबाबत नायब तहसीलदार यांना विचारणा केली असता जिल्हा खनीकर्म अधिकारी कारवाई करेल, असे सांगितले. दरम्यान भद्रावती तालुक्यातील कचराळा, जेना, चंदनखेडा, पाटाळा, पारोधी, पिपरी, कोंढा, चारगाव, मुधोली, कोकेवाडा या घाटावरून वाळू तस्करी जोरात सुरू आहे. राळेगाव हा वर्धा नदीवरील घाट वगळता इतर घाटांचा लिलाव झालाच नाही. मात्र येथून वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. वाळू तस्करीतून काही अधिकारी आर्थिकदृष्ट्या गब्बर झाल्याचे बोलले जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाचा पंचनामा केला मात्र ट्रकमध्ये वाळू नसल्याने जप्त करण्याचा आम्हास अधिकार नाही. त्यामुळे ट्रक आम्ही जप्त करून तहसील कार्यालयात लावला नाही. यावर पुढील कारवाई जिल्हा खणीकर्म अधिकारी करेल. – मनोज आकनुवार, नायब तहसीलदार तथा पथक प्रमुख.