चंद्रपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चंद्रपूर दीक्षाभूमीचा लवकरच कायापालट होणार आहे. राज्य शासनाने दिक्षाभूमीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ५६ कोटी ९० लक्ष रुपयांच्या कामास प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नाने हा निधी मिळाला आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगात नागपूर आणि चंद्रपूर अशा दोनच ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास झाला आहे, मात्र चंद्रपूर येथील दीक्षाभूमी अविकसित राहिली होती. येथे देशभरातून येणाऱ्या अनुयायांसाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या, परिणामी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होत होती.

हेही वाचा – गडचिरोली : कबुतर चोरले? चार चिमुकल्यांना अमानुष मारहाण; व्हायरल व्हिडिओने खळबळ…

या अनुषंगाने दीक्षाभूमीच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार प्रयत्नशील होते. आमदार किशोर जोरगेवार यांनी पहिल्याच हिवाळी अधिवेशनात दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी सदर मागणी सातत्याने लावून धरली होती. त्यांनी दीक्षाभूमी समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवून आणली होती.

सत्ता परिवर्तनानंतर, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीच्या विकासासंदर्भात घोषणा केली होती. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे माजी आमदार नाना शामकुळे यांनी २००९ ते २०१९ पर्यंत सलग दहा वर्ष प्रतिनिधित्व केले. मात्र बौद्ध धर्मीय आमदाराला जे शक्य झाले नाही ते एका बुरड समाजाचे प्रतिनिधित्व करणारे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी शक्य करून दाखविले. अतिशय पावन व ऐतिहासिक असलेल्या चंद्रपूर दीक्षाभूमीसाठी ५६ कोटी ९० हजाराचा निधी खेचून आणला.

राज्य शासनाने अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील मान्यवर व्यक्तींची स्मारके बांधणे तसेच ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या स्थळांचा विकास करणे या योजनेंतर्गत चंद्रपूर दिक्षाभूमीचा सर्वांगिण विकास करणे शासनाच्या विचाराधीन होते. याबाबतचा प्रस्ताव उच्चस्तरीय सचिव समितीसमोर ठेवण्यात आला होता. या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. दिक्षाभूमीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी ५६ कोटी ९० रुपयांचा निधीस शासनाने प्रशासकीय मंजुरी प्रदान केली आहे.

हेही वाचा – नागपूर : आता मंगळागौरींच्याही स्पर्धा, प्रशिक्षणाचीही सोय, काय आहे हा उपक्रम ?

यामध्ये तीन मजली इमारत बांधण्यात येणार आहे. इमारतीसाठी लागणारे विद्युत जोडणी, अग्निशमन यंत्रणा, फर्निचर, पाणी पुरवठा यंत्रणा, सुरक्षा भिंत, दीक्षाभूमी परिसरातील रोड, सांडपाणी व्यवस्थापन यंत्रणा, ६५ फुटाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, स्थिम पार्क, म्युरल, पार्किग व्यवस्था, वातानुकूलित यंत्रणा, सीसीटिव्ही इत्यादी बाबी अंर्तभूत करण्यात आल्या आहे. तसेच सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच चंद्रपूर दीक्षाभूमीचे रूपडे पालटणार आहे. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतरच कामाला सुरुवात होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने चंद्रपूरची पवित्र दीक्षाभूमी पावन झालेली आहे. या दीक्षाभूमीवर दरवर्षी १५ व १६ ऑक्टोंबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कार्यक्रमाला देशविदेशातील बौद्ध बांधव येथे एकत्र येतात. तसेच विदर्भातील बौद्ध बांधवांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाची या दिवशी शोभायात्रा काढण्यात येते. तसेच अस्थिकलश दर्शनासाठी दीक्षाभूमी येथे ठेवण्यात येतो. हजारो बौद्ध बांधव या अस्थिकलशाचे दर्शन घेतात.