चंद्रपूर: केंद्र सरकारने वीज प्रकल्पांना सल्फर नियंत्रण यंत्रणात सूट दिली असतानाच सर्वात मोठे औष्णिक वीज केंद्र असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मात्र वीज केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेपासून होणाऱ्या प्रदुषणामुळे सर्वसामान्यांना श्वसन रोगासह अन्य आजाराने ग्रासले आहे. मागील सात महिन्यात प्रदूषणामुळे झालेल्या आजाराने ५५ लोकांचे मृत्यू झाले आहेत तर ४९९५ पेक्षा अधिक प्रदुषण बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

औष्णिक वीज केंद्रासह अन्य उद्योगांमुळे या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण वाढले आहे. २९२० मेगावॅट क्षमतेच्या चंद्रपूर महाऔष्णीक वीज केंद्रातील सात संचात दररोज हजारो टन कोळसा जाळला जातो. त्यातून निघणाऱ्या राखेमुळे प्रदुषण वाढते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मध्यंतरी चंद्रपूर वीज केंद्राला नोटीस बजावली होती. तर एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा यांनीही न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

कर्मवीर मां.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अहवालानुसार २०२३ ते २०२५ या कालावधीत त्वचारोगाचे ७७ हजार ५४३, अस्थमाचे ११ हजार ५६८, ऱ्हदयविकाराचे ७ हजार ८३ आणि श्वसन संबंधीत ५ हजार ७११ रुग्णांची त पासणी करण्यात आली होती. वायू प्रदुषणामुळे फुफुसाचे आजार बळावतात. वरील कालावधीत फुस्फुसाच्या क्षयरोग ८२१ रूग्ण आढळले होते. गर्भवतींवरही प्रदुषणाचा परिमाम होतो. जानेवारी ते डिसेंबर २०२३ या कालावधीत १ हजार २५४ , जानेवारी ते डिसेंबर, २०२४ या कालावधीत १ हजार ५६० तर , जानेवारी ते २५ जुन २०२५ या कालावधीत ७७४ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली होती.

चंद्रपूर राज्यात प्रदूषणाच्या यादीत आघाडीवर आहे. एकूण रुग्णांच्या संख्येपैकी दमा, अॅक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन, ब्राँकायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग व इतर श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. २०२१-२४ या मागील चार वर्षांत विविध विकारांचे ३३ हजार १९० रुग्ण आढळले. त्यातील एकूण ३५१ जणांचा मृत्यू हा श्वसनाशी संबंधित आजाराने झाला, असे मां.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अहवालात नमुद आहे.

नियमात शिथिलता

प्रदुषण रोखण्यासासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळाने ठोस पावले उचलण्याची गरज असतानाच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने वीज प्रकल्पांना सल्फर नियंत्रण यंत्रणा बसवण्यातून सूट देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चंद्रपुरात प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता आहे.

“ राखेपासून होणाऱ्या प्रदूषणामुळे श्वसनाचे विशेषत: लहान मुलांमध्ये दमा, ज्येष्ठांना श्वसन, त्वचा रोग, केस गळती आणि किडणीचे आजार मागील काही दिवसात वाढले आहे. केवळ प्रदूषणामुळे या समस्या निर्माण होत आहेत.”- डॉ.अशोक वासलवार माजी अध्यक्ष, आयएमए

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ केवळ प्रदूषणामुळे नाही तर विविध आजारामुळे सात महिन्यात ५५ पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.”- डॉ. मिलिंद कांबळे अधिष्ठाता, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तथा रुग्णालय