चंद्रपूर : वाघांच्या हल्ल्यांमुळे तेंदू व्यवसायावर सध्या दहशतीचे सावट आहे. मागील नऊ दिवसांत तेंदू संकलनासाठी जंगलात गेलेल्या आठ जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला. जिल्ह्यातील ३५ हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार देणारा हा व्यवसाय ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांच्या उदरनिर्वाहाच मुख्य स्त्रोत आहे. यामुळे तेंदू संकलनासाठी जंगलात जाताना दक्ष रहावे आणि सात मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
जिल्ह्यात ब्रम्हपुरी, मध्य चांदा, चंद्रपूर व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच चंद्रपूर वनविभागाचा समावेश असून सध्या जिल्ह्यात तेंदूपाने संकलन हंगाम सुरू आहे. यंदा जिल्ह्यात एकूण ७५ तेंदूपाने घटकांपैकी ७० घटकांमध्ये संकलनाचे कार्य सुरू आहे. यातून दरवर्षी सुमारे ३५ हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना रोजगार मिळतो. जिल्ह्यातील वनक्षेत्रांमध्ये वाघांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्यामुळे तेंदूपाने संकलनादरम्यान खबरदारी घेणे आवश्यक आहे. वन विभागामार्फत यासाठी विशेष जनजागृती मोहीम, विशेष पथकांची नियुक्ती व विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि, तेंदूपाने हंगाम-२०२५ दरम्यान मे महिन्यात वाघाच्या हल्ल्यांमध्ये आठ व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे वनविभागाकडून तेंदूपाने संकलन करणाऱ्या ग्रामस्थांना सुरक्षा उपाय काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन चंद्रपूर वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.
वाघांचा अधिवास असलेल्या वनक्षेत्रात प्रवेश टाळावा, संकलनासाठी केवळ नजीकच्या गावातील व्यक्तींनाच परवानगी द्यावी, सकाळी ८ वाजतापूर्वी जंगलात प्रवेश करू नये व संध्याकाळी पाच वाजतापूर्वीच जंगलातून बाहेर पडावे, एकट्याने जंगलात जाऊ नये, समूहानेच वनविभागाच्या देखरेखीखाली संकलन करावे, प्राथमिक बचाव दल, कंत्राटदारांचे अग्निशमन कर्मचारी व वनक्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संकलन करणाऱ्यांवर लक्ष ठेवावे व वाघाचा वावर आढळल्यास तत्काळ सतर्क करावे, संकलनादरम्यान पुरवण्यात आलेला मानवी मुखवटा डोक्याच्या मागील भागात लावावा, वाघाची चाहूल लागल्यास त्वरित मागे फिरावे व वनविभागाला माहिती द्यावी, या मार्गदर्शन सूचना वन विभागाकडून करण्यात आल्या आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपली व आपल्या सहकाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी केले आहे.
नऊ दिवस आणि आठ बळी
- १० मेपासून रविवारपर्यंत एकूण आठ जणांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे.
- १० मे रोजी सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल गावातील सारिका शालिक शेंडे (५५), कांता बुद्धाची चौधरी (६०), शुभांगी मनोज चौधरी (३१) या तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलांचा मृत्यू झाला.
- ११ मे रोजी मूल तालुक्यातील नागाळा गावातील विमल बुद्धाजी शेंडे ही महिला चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील ५३७ कंपार्टमेंटमध्ये तेंदूपाने तोडण्यासाठी गेली असता वाघाच्या हल्ल्यात ठार झाली.
- १२ मे रोजी मूल तालुक्यात वडिलांकडे राहत असलेल्या भादुर्णा येथील भूमिका दीपक भेंडारे हिचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
- १४ मे ला चिमूर तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रामधील करबडा येथे कचराबाई अरुण भरडे (५४) ही महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली होती. वाघाने तिला ठार केले.
- रविवार, १८ मे रोजी नागभीड व मूल तालुक्यात वाघाने दोघांचा बळी घेतला. नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील मारोती नकडू शेंडे (६४) तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेले होते. वाघाने त्यांना ठार केले. मूल तालुक्यातील भादुर्णी येथील ऋषी झुगांजी पेंदोर (७०) जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेले असता वाघाने त्यांचा बळी घेतला.