चंद्रपूर: लोकसभेच्या चंद्रपूर-वणी-आर्णी मतदार संघातातील सहा पैकी वणी व आर्णी या दोन विधानसभा मतदार संघात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला तर चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा व वरोरा या चार विधानसभा मतदार संघात काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने वणी, आर्णी व बल्लारपूर विधानसभा मतदार संघात प्रचंड मतांची आघाडी घेवून निवडणूक जिंकली. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजपा समोर लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मतांची आघाडी टिकवून ठेवण्याचे आवाहन आहे.

या लोकसभा मतदार संघात महायुतीचे सुधीर मुनगंटीवार व महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात सरळ लढत आहे. बल्लारपूर, वणी, आर्णीत भाजप आमदार आहे तर वरोरा व राजुरा येथे काँग्रेसचे आणि चंद्रपुरात अपक्ष आमदार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांना आर्णी मतदार संघात १ लाख २६ हजार ६४८ मते मिळाली होती. तर कॉग्रेसचे बाळू धानोरकर यांना ६८ हजार ९५२ मते मिळाली होती. येथे भाजपाला ५७ हजार ६९६ मतांची आघाडी होती. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे डॉ.संदिप धुर्वे यांना ८१ हजार ५९९ मते मिळाली तर काँग्रेसचे शिवाजीराव मोघे यांना ७८ हजार ४६६ मते मिळाली. धुर्वे अवघ्या ३ हजार १३३ मतांनी विजयी झाले. लोकसभेच्या तुलनेत भाजपाची मते ४५ हजारांनी तर कमी झाली तर काँग्रेसची मते १० हजारांनी वाढली.

हेही वाचा : “नव्या स्वरूपातील गुन्हे सोडविण्याचे आव्हान झेलणारा पोलीस अधिकारी होणार”, सनदी सेवेत निवडप्राप्त अभय डागाची मनिषा

२०१९ च्या लोकसभेत कुणबी बहुल वणी विधानसभा मतदार संघात भाजपाचे अहीर यांना ९२ हजार ३६६ तर काँग्रेसचे धानोरकर यांना ९० हजार ३६७ मते मिळाली. अहीर यांना अवघ्या दोन हजार मतांची आघाडी होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांना ६७ हजार ७१० मते मिळाली तर काँग्रेसचे वामनराव कासावार यांना ३७ हजार ९१५ मते मिळाली. तर कुणबी समाजाचे मनसेचे उमेदवार संजय देरकर यांना २५ हजार मते मिळाली. भाजपाचे संजीव रेड्डी २७ हजार ७९५ मतांनी विजयी झाले. मात्र याच विधानसभा मतदार संघातून अहीर यांना केवळ दोन हजारांची आघाडी असतांना विधानसभेत २७ हजारांची आघाडी भाजपाला मिळाली. लोकसभेच्या तुलनेत येथे भाजपाचे २४ हजार ६५६ मते कमी झाली तर काँग्रेसची ५२ हजार ४५२ मते कमी झाली. २०१९ च्या लोकसभेत अहीर यांना राजुरा विधानसभेत ७३ हजार ८८० मते मिळाली तर धानोरकर यांना १ लाख ९ हजार १३२ मते मिळाली. लोकसभेत काँग्रेसला येथे ३५ हजार २५२ मतांची आघाडी मिळाली. परंतु २०१९ ची विधानसभा कॉग्रेसने अवघ्या अडीच हजार मतांनी जिंकली. येथे कॉग्रेसचे सुभाष धोटे यांना ६० हजार २२२, शेतकरी संघटनेचे ॲड.वामनराव चटप यांना ५७ हजार ७२७ तर भाजपाचे ॲड.संजय धोटे यांना ५१ हजार ५१ मते मिळाली.

हेही वाचा : चंद्रपुरची कन्या शारदा मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण

लोकसभेच्या तुलनेत येथे काँग्रेसची ४९ हजार मत कमी झाली. तर भाजपाची २२ हजार मते कमी झाली.२०१९ च्या लोकसभेत चंद्रपूर विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे धानोरकर यांना १ लाख ३ हजार ९३१ मते मिळाली तर भाजपाचे अहीर यांना ७८ हजार १८७ मते मिळाली. काँग्रेसला २५ हजार ७४४ मतांची आघाडी मिळाली. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार महेश मेंढे यांना केवळ १३ हजार मते मिळाली. भाजपाचे नाना शामकुळे यांना ४४ हजार ९०९ तर अपक्ष किशोर जोरगेवार यांना १ लाख १७ हजार ५७० मते मिळाली. जोरगेवार ७२ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय झाले. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत काँग्रेसची मते जवळपास ९० हजारांनी कमी झाली तर भाजपाची ३३ हजारांनी कमी झाली.

हेही वाचा : “सुधीर मुनगंटीवार यांनी खेळाडूंसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या”, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी.टी.उषा यांचे मत; म्हणाल्या…

२०१९ लाेकसभेत काँग्रेसचे धानोरकर यांना वरोरा विधानसभेत ८८ हजार ६२७ तर अहीर यांना ७६ हजार १६७ मते मिळाली. येथे धानोरकर यांना १२ हजारांची आघाडी मिळाली. विधानसभेत काँग्रेसया प्रतिभा धानोरकर यांना ६३ हजार ८६२ मते मिळाली तर भाजपाचे संजय देवतळे यांना ५३ हजार ६५५ मते मिळाली. विधानसभेत देखील धानोरकर यांची आघाडी अवघ्या दहा हजारांची होती. २०१९ च्या लोकसभेत बल्लारपूर विधानसभा मतदार संघात भाजपाचे अहीर यांना ६५ हजार ४८० मते मिळाली तर काँग्रेसचे धानोरकर यांना ९६ हजार ५४१ मते मिळाली. धानोरकर यांनी ३० हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांना ८६ हजार तर काँग्रेसचे डॉ. विश्वास झाडे यांना ५२ हजार ७६२ मते मिळाली लोकसभेच्या तुलनेत येथे भाजपाचे मताधिक्क्य वाढले तर काँग्रेसचे ४० हजार मते कमी झाली. भाजपा येथे ३३ हजार मतांनी विजयी झाली.