चंद्रपूर : साडेतीन वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून चंद्रपूर महापालिकेची प्रारूप प्रभागरचना बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात एकूण १७ प्रभागांतून ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहे. चार सदस्यीय प्रभाग १५ आणि तीन सदस्यीय प्रभागांची संख्या दोन आहे.
महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केली. या प्रभागरचनेनुसार महापालिकेच्या बहुसंख्य वॉर्डात किरकोळ बदल दिसून येत आहे. या प्रारूप प्रभागरचनेवर १५ सप्टेंबरपर्यंत आक्षेप, सूचना आणि हरकती महापालिकेकडे लेखी स्वरूपात नोंदवायच्या आहेत. २०११ च्या लोकसंख्येच्या आधारावर प्रभागरचना तयार करण्यात आली आहे. नव्या प्रारूप प्रभागरचनेत २०१७ चे प्रतिबिंब उमटले आहे. त्यात फारसा बदल झालेला नाही, असे बहुसंख्य माजी नगरसेवकांचे मत आहे.
दे.गो. तुकूम या प्रभाग क्रमांक एकमध्ये २० हजार ५५२ लोकसंख्या आहे. प्रभाग क्रमांक दोन शास्त्रीनगर, प्रभाग क्रमांक तीन एमईएल, प्रभाग क्रमांक चार बंगाली कॅम्प, प्रभाग क्रमांक पाच विवेक नगर, प्रभाग क्रमांक सहा इंडस्ट्रियल इस्टेट, प्रभाग क्रमांक सात जटपुरा, प्रभाग क्रमांक आठ वडगांव, प्रभाग क्रमांक नऊ नगिनाबाग, प्रभाग क्रमांक १० एकोरी मंदिर, प्रभाग क्रमांक ११ भानापेठ, प्रभाग क्रमांक १२ महाकाली मंदिर, प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठ, प्रभाग क्रमांक १४ पठाणपुरा, प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर, प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान कॉलरी, प्रभाग क्रमांक १७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अशी प्रभागांची नावे आहेत. हिंदुस्थान कॉलरी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन प्रभाग लोकसंख्येने कमी आहेत, तर तुकूम, विठ्ठल मंदिर, बाबुपेठ, जटपुरा या प्रभागातील लोकसंख्या २० हजाराच्या आणि इंडस्ट्रियल इस्टेट या प्रभागाची लोकसंख्या २१ हजारापेक्षा अधिक आहे.
प्रभागाच्या वर्णनामध्ये तफावत असल्यास नकाशातील हद्दीनुसार वर्णन ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच प्रभागाच्या सीमा दर्शवणारे नकाशे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, असे महपालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी कळवले आहे.