चंद्रपूर : मगील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने सोमवार रात्रीपासून जोर पकडला. मंगळवारी दिवसभर कुठे रिमझिम, तर कुठे जोरदार पाऊस झाला. यामुळे नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहे. गोसेखुर्द धरणाची दारे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदीची पाणीपातळी वाढून ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज गावाचा संपर्क तुटला. ब्रह्मपुरी, नागभीड तालुक्यांतील अनेक मार्ग सकाळपासून बंद पडले. ब्रह्मपुरी तालुक्यातील अहेरनवरगाव आणि नागभीड तालुक्यातील पळसगाव खुर्द या गावांत घराची भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही.
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात ४९.८ मिमी पावसाची नोंद झाली. ब्रह्मपुरीत १६२.८, तर नागभीड तालुक्यात १५२.४ मिमी पावसाची नोंद झाली. सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, रात्री पावसाचा जोर वाढला, तो मंगळवारी सकाळपर्यंत कायम होता. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने वर्धा, वैनगंगा नद्यांसह नाले ओसंडून वाहू लागले. त्यामुळे जिल्ह्यातील काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
गोसेखुर्द धरणाची दारे उघडण्यात आल्याने वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज हे गाव वैनगंगा नदीला लागूनच आहे. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. तालुका प्रशासन पूरपरिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी-वडसा, ब्रह्मपुरी-बोरगाव, ब्रह्मपुरी कन्हाळगाव आणि ब्रह्मपुरी-पारडगाव हे मार्ग बंद झाले आहेत. अहेरनवरगाव येथील पंढरी उरकुडे आणि नंदलाल ठेंगरे यांच्या घराची भिंत कोसळली. नागभीड तालुक्यातील मांगली नागभीड, मौशी-ब्रह्मपुरी, नागभीड-डोंगरगाव, नागभीड-नवेगाव हे मार्ग बंद पडले आहेत.
नगर परिषद क्षेत्रातील चिखल परसोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात पाणी साचले आहे. नागभीड येथील जयसिंगनगराला पाण्याने वेढले आहे. नवखळा गावात अनेक घराभोवती पावसाचे पाणी जमा आहे. तालुक्यातील पळसगाव खुर्द येथील चंद्रकला हिवराज सोनटक्के यांचे घर अचानक कोसळले. यात जिवित हानी झाली नाही. चंद्रपूर शहरातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे. या पावसाने मुख्य मार्गावर नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. बल्लारपूर तालुक्यातही तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. हा पाऊस पिकांसाठी योग्य असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सिंदेवाही, चिमूर, भद्रावती, वरोरा, राजुरा, जिवती, गोंडपिंपरी यासह अन्य तालुक्यांत पावसाने हजेरी लावली