चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. येथे मोठ्या संख्येने जमलेला कार्यकर्ता वर्ग याची साक्ष देणारा आहे. जिद्द आणि विजयाचा संकल्प या भरोशावर महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता आणू, असा विश्वास आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केला. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर व माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्व डावलून एकप्रकारे पालकमंत्र्यांनी महापालिकेचे नेतृत्व आमदार जोरगेवार यांच्याकडे स्वत:च सोपवले. यामुळे अहीर व मुनगंटीवार समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कन्यका सभागृहात महापालिका निवडणूक आढावा बैठक, महानगर अध्यक्ष आणि नवनियुक्त मंडळ अध्यक्ष सत्कार समारंभ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह आयोजनाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते अशोक जिवतोडे, माजी महापौर राखी कंचर्लावार, माजी उपमहापौर अनिल फुलझले, विजय राऊत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, माजी नगरसेवक संजय कंचर्लावार, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महानगर अध्यक्ष कासनगोट्टूवार यांच्यासह नवनियुक्त मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, रवी जोगी, सारिका नंदुरकर, प्रदीप किरमे यांचा पालकमंत्री उईके आणि आमदार जोरगेवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांसाठी समर्पित असलेले जोरगेवार यांच्यासारखे नेतृत्व आपल्याला लाभले आहे. या ताकदीवर आपण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकून पक्ष अधिक बळकट करू, असा विश्वास यावेळी पालकमंत्री उईके यांनी व्यक्त केला.

‘नव्या संघटन पर्वाची सुरुवात’

नवीन मंडळ अध्यक्षांची आपण निवड केली आहे. या मंडळ अध्यक्षांना सोबत घेऊन महानगर अध्यक्षांनी जनतेचे प्रश्न सोडवण्याचे काम करावे. ही नव्या संघटन पर्वाची सुरुवात आहे. आगामी महापालिका आपल्या कामाचे आणि सेवाभावाचे मूल्य जनतेसमोर मांडण्याची संधी आहे, असे आमदार जोरगेवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री उईके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त कोणते कार्यक्रम घ्यायचे यासाठी आमदार जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीत भाजप, काँग्रेस, अपक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप असा राजकीय प्रवास राहिलेल्या आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे थेट महापालिका निवडणुकीचे नेतृत्व सोपविण्याची थेट घोषणा केल्याने महापालिकेत साडेसात वर्ष सत्ता मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा एकप्रकारे अपमान केला आहे अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार व अहिर समर्थक यांच्यात उमटली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे समर्थक खासगीत बोलताना नाराजी व्यक्त करीत आहे. पालकमंत्री यांना चंद्रपूर महापालिका येथील राजकारणाची माहिती व अभ्यास नसताना असे वक्तव्य करून पक्षाचे मोठे नुकसान करीत आहे असेही पदाधिकारी व कार्यकर्ते बोलत आहेत.