नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगतच नाही तर नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगतही आता मानव-वन्यजीव संघर्षाची सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर वाघाने हल्ला केला. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला.
पेंच व्याघ्रप्रकल्पात गेल्या दोन वर्षात मानव-वन्यजीव संघर्षाची सुरुवात झाली आहे. व्याघ्रप्रकल्पाच्या बफर, प्रादेशिक वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात हळूहळू वाढ होत आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास देवलापार वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या मौजा देवलापार येथील शेतात कापूस काढत असताना लोहडोंगरी येथील रहिवासी विमला ईनवाते यांच्यावर वाघाने हल्ला केला. देवलापार येथील कक्ष क्र. ५८१ राखीव वनालगतच्या शेतात महिलेला ओढत नेऊन वाघाने ठार मारले. वनखात्याने याठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले आहे.
दुपारी दीड वाजताच्या सुमारास विमला ईनवाते यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह अंत्यविधीकरिता पोलिसांमार्फत कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. मृतकांच्या वारसदारांना तातडीने नुकसान भरपाई म्हणून दहा लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. प्रादेशिक वनविभागाच्या उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक जी.एफ. लुचे यांनी हा धनादेश कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक संतोष कायगवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. टूले, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. बन्सोड, वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी ठाकरे उपस्थित होते. यावेळी उपवनसंरक्षक डॉ. विनीता व्यास यांनी सदर परिसरात गस्त घालून व्याघ्र सनियंत्रण करण्याचे आदेश क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिले. तसेच स्थानिक ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील मानव-वन्यजीव संघर्ष वाढीस लागला आहे. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात १७५ नागरिकांचा वाघ व इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. २०२५ मधील अवघ्या सहा महिन्यांत २५ ग्रामस्थांचा बळी गेला. आताही गेल्या नऊ दिवसात चार ते पाच जण वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले. चंद्रपूर जिल्ह्यातील हा संघर्ष वाढतच चालला असताना नागपूर जिल्ह्यातही गेल्या दोन वर्षात मानव-वन्यजीव संघर्षाची सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या बफरसह प्रादेशिकमध्येही वाघांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. येथेही वाघाच्या हल्ल्यात जनावरांसह मानवी मृत्यूची संख्या वाढत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाप्रमाणेच नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पात देखील पर्यटन प्रवेशद्वाराची संख्या वाढत आहे. अतिरिक्त पर्यटनामुळे वाघांच्या अधिवासावर गदा येऊन वाघ जंगलाबाहेर पडत आहेत. परिणामी येथेही मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे.
