चंद्रपूर: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता विवेक फेढे यांचा एक धक्कादायक व्हिडिओ आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी समाज माध्यमावर सार्वत्रिक केला आहे. या व्हिडिओत अभियंता फेंढे कंत्राटदाराकडून २० हजार रुपयाचे पॉकेट टेबलाचे आडून घेत असल्याचे त्यात स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान हा व्हीडीओ समाज माध्यमात सार्वत्रिक होताच सीईओ पुलकीतसिंग यांनी अभियंता फेंढे यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याने अधिकारी व कंत्राटदारांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या व्हिडिओमध्ये फेढे हे स्वतःच्या कार्यालयातील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये २० हजार रुपये स्वीकारताना स्पष्टपणे दिसत आहेत एवढेच नाही, तर पैसे स्वीकारल्यानंतर ते समोरील व्यक्तीला विचारतात किती आहे. यावर समोरील व्यक्ती सांगतो २० आहे. यानंतर फेंढे उर्वरित पैशांची मागणी करतात. त्यावर समोरील व्यक्ती लवकरच उर्वरित पैसे आणतो असे आश्वासन देताना ऐकू येतो.
ही घटना केवळ लाच स्वीकारण्यापुरती मर्यादित नाही तर उर्वरित लाचेची मागणी झाल्याचे ठोस पुरावे यातून समोर आले आहेत. महत्वाचे म्हणजे, विवेक फेंढे यांना काही महिन्यांपूर्वीच भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे निलंबित करण्यात आले होते. परंतु स्थानिक सत्ताधारी आमदाराच्या राजकीय आशीर्वादामुळे ते पुन्हा सेवेत रुजू झाले असा आरोप आम आदमी पक्षाने केला.
दरम्यान आता या व्हीडीओ नंतर अभियंता फेंढें यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केल्याने अधिकाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ म्हणजे भ्रष्टाचाराचे जिवंत उदाहरण असून, यामध्ये कायदेशीर पातळीवर तात्काळ कारवाई होणे अत्यावश्यक आहे. या प्रकरणी विवेक फेंढे यांच्यावर गुन्हा दाखल करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) चौकशी सुरू करावी अशी मागणी आपने केली आहे. दरम्यान फेंढे यांच्यावर परवानगी नेताना कंत्राटदारांना मोठ्या प्रमाणात कार्यादेश दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. तसेच अनेक कंत्राटदारांशी मिळून हा सर्व प्रकार मागील अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. अभियंता फेंढे यांचा पैसे घेतानाचा व्हिडिओ एका कंत्राटदाराने आम आदमी पक्षाला दिला आहे. मात्र हा कंत्राटदार आता समोर येत नसल्याने त्यांच्याकडेही संशयाच्या दृष्टीने बघितले जात आहे.