नागपूर: महाविकास आघाडीच्या वतीने एक नोव्हेंबरला मुंबईमध्ये मत चोरीच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे हे पहिल्यांदा सहभागी झाले होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सरकारवर मतचोरीचा आरोप केलेला आहे.

यावेळी त्यांनी दुबार मतदार असलेल्यांचे नावे वाचून दाखवली. यावर महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर शब्दात टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांना दुबार मतदार हे केवळ हिंदूच का दिसतात त्यांना कामठी मालेगाव या मतदारसंघातील इतर धर्मिय का दिसत नाही? असा प्रश्न करत महाराष्ट्राचा पप्पू कोण ? अशा शब्दातही टीका केली.

राज्यातील आणि केंद्रातील सरकार जेन झी पिढीच्या मुलांना का घाबरतंय? असा प्रश्न शिवसेनेचे (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या. यानंतर नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

महाविकास आघाडी आघाडीकडून वारंवार भाजपवर मतचोरीचे टीका केली जाते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले. यावेळी मतचोरी करून हे खासदार निवडून आले का? हे उद्धव ठाकरे यांनी आधी स्पष्ट करावे. तेव्हा निवडणुका झाल्यावर त्यांनी तात्काळ हा प्रश्न उपस्थित करायला हवा होता. आज विधानसभेमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्यामुळे त्यांच्याकडून मतचोरीचा आरोप केला जातो असेही बावनकुळे म्हणाले.

उद्धव ठाकरे पराभवाच्या मानसिकतेत

उद्धव ठाकरे आणि संपूर्ण महाविकास आघाडी ही पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे. हे अशाच प्रकारे विचार करत राहिले आणि काम करत राहिले तर पुढचे २५ वर्ष तरी यांना जनता कधीही स्वीकारणार नाही. उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे सर्वेक्षण केलेले आहे. यामध्ये जनता त्यांना स्वीकारणार नाही हे लक्षात आलेले आहे. तसेच महायुती निवडून येणार हे त्यांना माहीत झालेले आहे. त्यामुळे हे सगळे भांबावले असून भाजपवर चुकीचे आरोप करत आहेत अशी टीका बावनकुळे यांनी केली.

आधी आदित्यने राहुल गांधीला स्वीकारले आणि आता…

उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आता राहुल गांधी यांना आपला नेता म्हणायला लागलेले आहेत. आदित्य ठाकरे यांनी आधी राहुल गांधी यांचे वर्तन स्वीकारलं होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे ही राहुल गांधी यांना स्वीकारायला लागलेले आहेत. राहुल गांधींच्या पावलावर पाऊल टाकणारे सगळे पप्पू आहेत. महाराष्ट्राचे पप्पू कोण आहेत हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, असेही बावनकुळे म्हणाले.