नागपूर: संजय राऊत हे रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन बोलतात. यावरून त्यांच्यावर अनेकदा आरोपही झाले आहेत. हल्लीच संजय राऊत यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. यावरून भाजपकडून संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेण्यात आला. त्यांनी सामनामधूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांचा समाचार घेत त्यांना इशारा दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कमी जागा निवडून येण्यामागे संजय राऊत कारणीभूत आहेत. त्यांनी आमच्या पक्षात लुडबूड करणे बंद करावे असा इशाराही दिला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आई महालक्ष्मी जगदंबेला प्रार्थना करतो फडणवीस यांना उदंड आयुष्य मिळावे. त्यांचा विकसित महाराष्ट्राचा संकल्प ते पूर्ण करो अशी प्रार्थना करतो. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनाही बावनकुळे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचे, हे सर्वांना माहिती आहे. ते कमी बोलले असते तर विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या जागा वाढल्या असत्या. त्यांच्या बोलण्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नुकसान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२९ पर्यंत जनमत मिळाले आहे.
संजय राऊत यांनी त्यांच्या पक्षात कोणाला नेता मानायचे हे ठरवावे. मात्र भाजप आणि आमच्या राष्ट्रीय नेतृत्वामध्ये लुडबुड करण्याचा त्यांना अधिकार नाही. मोदी समर्थ, सक्षम आहेत. यापूर्वी अनेकांनी वयाच्या ८२ वर्षापर्यंत काम केले आहे. संजय राऊत यांना पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल ईर्षा होत आहे, असा आरोपही बावनकुळेंनी केला. एकनाथ खडसे यांनी आपली उंची कायम ठेवून आरोप लावले पाहिजे. गिरीश महाजन यांच्या बद्दल वैयक्तिक आरोप करून महाजनांच्या जीवनाबद्दल संशय निर्माण करणे योग्य नाही. या पद्धतीचा राजकारण खडसेंनी सोडले पाहिजे. गिरीश महाजन अत्यंत निष्कलंक नेते आहेत. असे बोलून खडसेंनी आपली पत कमी करू नये, असा सल्ला बावनकुळे यांनी दिला. लोढाचे विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत फोटो आहेत. फोटो पाहून संबंध जोडणे योग्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.