नागपूर: नागपूरसह महाराष्ट्रात सर्वत्र श्री गणेशोत्सवाचा सन उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी बाप्पांचे आगमन होत असतांनाच सोन्याचे दरात मोठे बदल बघायला मिळाले. सोन्याच्या दराने नवीन उंची गाठल्याने भाविकांच्या मनात धडकी भरली आहे. श्रीगणेश चतुर्थीला सोन्याचे दर काय होते? त्याबाबत आपण जाणून घेऊ या.
सनासुदीच्या काळात सोन्याच्या दरात मोठे चढ- उताराचा क्रम कायम आहे. अमेरिकेने भारतावर कर लादल्यावर भारतातील सराफा व्यवसाय अडचणीत येण्याचा धोका ऑल इंडिया जेम ॲण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने (जीजेसी) वर्तवला होता. त्यानंतर सोन्याचे दरात मोठी वाढही झाली. परंतु त्यानंतर सोन्याचे दर घसरले होते. आता पून्हा सोन्याचे दर वाढतांना दिसत आहे. नागपुरातील सराफा बाजारात २० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सोन्याचे दर घशरून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९८ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९१ हजार ९०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७७ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६४ हजार २०० रुपये नोंदवले गेले होते.
दरम्यान जन्माष्टमीच्या काळात नागपुरात १६ ऑगस्ट २०२५ रोजी सोन्याचे दर घसरून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ९९ हजार ८०० रुपयेपर्यंत आले होते. परंतु त्यानंतर पून्हा दर वाढले आहे. दरम्यान नागपुरातील सराफा बाजारात श्रीगणेश चतुर्थीला बाप्पांचे आगमन होत असतांनाच (२७ ऑगस्ट २०२५ रोजी) सोन्याचे दर पुन्हा वाढले. नागपुरातील सराफा बाजारात २७ ऑगस्ट २०२५ रोजी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम १ लाख १ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ९४ हजार १०० रुपये, १८ कॅरेटसाठी ७८ हजार ९०० रुपये, १४ कॅरेटसाठी ६५ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात २० ऑगस्टच्या तुलनेत २७ ऑगस्टची तुलना केल्यास सोन्याच्या दरात २४ कॅरेटमध्ये २ हजार ४०० रुपये, २२ कॅरेटमध्ये २ हजार २०० रुपये, १८ कॅरेटमध्ये १ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटमध्ये १ हजार ६०० रुपये वाढले आहे.
चांदीच्या दरातही मोठे बदल
नागपुरातील सराफा बाजारात २० ऑगस्टला सकाळी चांदीचे दर प्रति किलो १ लाख १२ हजार १०० रुपये होते. हे दर २७ ऑगस्टला प्रति किलो १ लाख १६ हजार ८०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे नागपुरात २० ऑगस्टच्या तुलनेत २७ ऑगस्टला चांदीच्या दरात तब्बल ४ हजार ७०० रुपये प्रति किलो वाढ झाली आहे.