लोकसत्ता टीम

नागपूर: राज्यात उशिरा पोहचलेला मान्सून आणि सुरवातीला वेगात तर नंतर संथ झालेली त्याची वाटचाल यामुळे राज्यातील धरणे अजूनही अर्धवट भरलेली आहेत. मात्र आता राज्यात पाऊस जोर पकडणार आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात होणाऱ्या बदलांचा परिणाम राज्यातील पावसावर होणार आहे. १५ जुलै रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर १९ जुलै रोजी आणखी एक चक्रीवादळ तयार होईल. यामुळे महाराष्ट्रासह मध्य भारतात पाऊस वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

आणखी वाचा-केवळ तीन भूखंड विक्रीतून दोनशे कोटी, महापालिकेला श्रीमंत करणारी ‘लंडन स्ट्रीट आहे तरी काय?

या स्थितीमुळे १७ व १८ जुलै या काळात कोकण किनारपट्टीसह अन्य भागातही पावसाचा जोर वाढवण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच कोकणात ऑरेंज अलर्ट दिला आहे.

धरणासाठा कमी

जुलैचा पंधरवाडा लोटला त्यानंतरही राज्यातील धरणांमध्ये पुरेसा जलसाठा झालेला नाही. धरणांमध्ये सध्या फक्त ३० टक्केच पाणीसाठा आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील धरणांत सरासरी १६ टक्के कमी जलसाठा आहे. मान्सून लांबल्याने आणि धरणक्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने राज्यातील धरणे अजून भरलेली नाही. अजूनही सर्वत्र पुरेसा पाऊस झालेला नाही. यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील मोठ्या, मध्यम, लघू धरणांमध्ये १६ टक्के पाणीसाठा कमी आहे.