सहकारी प्राध्यापकांविरोधात लैंगिक छळाची तक्रार असल्याचे सांगून त्यांची आर्थिक लूट करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. धर्मेश धवनकर यांना प्राथमिक चौकशी समितीने दोषी ठरवले आहे. तसेच त्यांची विभागीय चौकशी करण्यात यावी, अशी शिफारस अहवालात केली असून उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती विभागीय चौकशी करणार आहे.
हेही वाचा- नागपूर शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत; २२ उमेदवार रिंगणात, पाच उमेदवारांचे अर्ज मागे
धवनकर प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश अजय चिंतामण चाफले यांच्या समितीने आपला अहवाल कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना सोपवला आहे. चाफले यांनी सातही तक्रारकर्त्यांना बोलावून त्यांचा जबाब नोंदवला. तक्रारकर्तेही शेवटपर्यंत तक्रारीवर ठाम होते. त्यांनी धवनकर यांनी कशी फसवणूक केली याची संपूर्ण माहिती दिली. त्यावर समितीने अहवालात धवनकर यांना दोषी ठरवल्याची माहिती आहे. तसेच धवनकर यांची विभागीय चौकशी करावी, अशी शिफारसही केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशांची समिती स्थापन केली जाणार असून ही समिती चौकशी करणार आहे.
हेही वाचा- मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची फरफट; परीक्षेच्या तोंडावर पुस्तकांपासून वंचित
चौकशीदरम्यान निलंबित राहणार
चौकशी समितीच्या अहवालानंतर थेट आरोपीला बडतर्फ करता येत नाही. तसेच चौकशी सुरू असताना त्यामध्ये छेडछाड होण्याची शक्यता असल्याने आरोपीला तूर्तास निलंबित करणे आवश्यक असते. त्यामुळे धवनकर यांना विभागीय चौकशी सुरू असताना निलंबित केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठातील एका अधिकाऱ्यांनी दिली.