नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) चिंतन शिबिराच्या पूर्वसंध्येला पक्षाचे नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करून खळबळ माजवून दिली होती. मात्र दुसऱ्या दिवशीच या मुद्यावर ‘यू-टर्न’ घेत आपण तसे बोललो नाही, असा खुलासा केला. अंतरवाली सराटीतील पोलिसांवरील हल्ल्यामागे शरद पवार असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला होता हे येथे उल्लेखनीय.
चिंतन शिबिराच्या एकदिवसा आधी नागपुरात दाखल झालेल्या भुजबळ यांनी दुपारी त्यांच्या समता परिषदेचा मेळावा घेतला. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयाला विरोध करणारे भुजबळ या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अपेक्षे प्रमाणे भुजबळ यांनी शासन निर्णयाला विरोधही केला. यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का बसला, त्यामुळे तो एकतर मागे तरी घ्या, किंवा त्यात सुधारणा तरी करा, अशी जाहीर मागणी त्यांनी केली.
पण नंतर त्यांनी त्यांचा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे वळवला. दोन वर्षापूर्वाी अंतरवाली सराटीत पोलिसांनी मराठा समाज बांधवांवर केलेल्या लाठीहल्ल्याचा मुद्या उपस्थित करीत त्यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. या हल्ल्यामागे शरद पवार हे होते, असा गंभीर आरोप करून त्यांनी खळबळ उडवून दिली. विशेष म्हणजे मेळाव्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरून कौतूकही केले. यावर चोवीस तास उलटत नाही तोच भुजबळ यांनी ‘यू-टर्न’ घेतला.
काय म्हणाले भुजबळ
शुक्रवारी चिंतन शिबिरात बोलताना भुजबळ म्हणाले “ अंतरवाली सराटीतील लाठी हल्ल्या मागे शरद पवार यांचा हात होता ,असे मी म्हणालो नाही तर तेथे त्यांचे दोन आमदार होते,असे मी बोललो”