नागपूर: मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील परासिया गावातून सर्दी-खोकल्यावरील कफ सिरप घेतल्यानंतर गंभिरावस्थेत नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) दाखल झालेल्या १४ मुलांपैकी ६ जणांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपूर ‘एम्स’ आणि काही खासगी रुग्णालयातही दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने हा आकडा आठवर पोहोचला असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

नागपूर मेडिकलच्या बालरोग विभागात २६ ऑगस्ट रोजी परासिया गावातून कफ सीरपमुळे गंभीर झालेला पहिला रुग्ण दाखल झाला होता. त्यानंतर २ ऑक्टोबरपर्यंत एकूण १४ मुले भरती झाली आहेत. या सर्व बालकांचे वय दीड ते ९ वर्षांदरम्यान आहे. प्राप्त माहितीनुसार, छिंदवाडा व परासिया परिसरातील डॉक्टरांनी या मुलांना ‘कोल्ड्रिफ’ नावाचे कफ सिरप दिले होते. सुरुवातीला बरे झाल्यानंतर आठवड्याभरात त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली.

मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्या सहाही मुलांचा मृत्यू हा मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्या मेडिकलच्या बालरोग विभागात सहा मुले भरती असून, त्यापैकी चार मुले जीवनरक्षण प्रणालीवर (व्हेंटिलेटर) आहेत. मूत्रपिंड विकारामुळे त्यांच्यावर डायलिसिसचे उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे मेडिकलच्या बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. मनीष तिवारी यांनी सांगितले.

मध्य प्रदेशात औषधांवर बंदी

सिरपमुळे मुलांची प्रकृती बिघडण्याच्या गंभीर घटनेनंतर मध्य प्रदेश अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने नागपुरातील मेडिकलमधील बालरोग विभागाला भेट दिली. त्यांनी रुग्णांच्या नातेवाइकांकडून संबंधित कफ सिरपची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. औषधांच्या बॉटल सीलबंद नसल्याने ते नमुने घेऊ शकले नाहीत. मात्र, मध्य प्रदेशात या संबंधित कफ सिरपच्या बॅचेसच्या विक्रीवर तत्काळ बंदी घालण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

प्रकरण काय ?

मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे सहा मुलांच्या मृत्यूच्या प्रकरणात एक मोठा खुलासा समोर आला आहे. कफ सिरपमुळे मुलांचे मूत्रपिंड निकामी झाले. त्यांना देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकॉल या रसायनाचा समावेश असल्याचा संशय आहे. २० सप्टेंबरनंतर छिंदवाड्याच्या विविध भागात सर्दी, खोकला आणि तापामुळे अनेक मुलांनी लघवी करणे बंद केले होते. त्यामुळे छिंदवाडा जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्ड्रिफ आणि नेक्स्ट्रो-डीएस कफ सिरपच्या विक्रीवर बंदी घातली आहे आणि पालक, डॉक्टर आणि वैद्यकीय संचालकांसाठी एक सल्लागार जारी केला आहे.