Chhota Matka Tiger नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट “सीएम” उर्फ “छोटा मटका” याचे भवितव्य आता जवळजवळ अंधारात सापडले आहे. या वाघाच्या समोरच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या व्याघ्रप्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे सातत्याने “सीएम” उर्फ “छोटा मटका” या वाघाला पाहणाऱ्या पर्यटकांनी साडेतीन महिन्यांपूर्वीच त्याला फ्रॅक्चर असल्याची दाट शक्यता वर्तवली होती. मात्र, ताडोबातील कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने ताडोबातील अधिकाऱ्यांना तो नैसर्गिकरित्या ठीक होईल हेच शेवटपर्यंत सांगितले. जखमी झाल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर त्याची तपासणी करूनही या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या लक्षात ही बाब आली नाही का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
साडेतीन महिन्यांपूर्वी बुद्ध पौर्णिमेला “ब्रम्हा” या वाघासोबत “छोटा मटका” या वाघाची लढाई झाली. या लढाईत “ब्रम्हा” जागीच ठार झाला तर “छोटा मटका” गंभीर जखमी झाला. पर्यटकांनी त्याचवेळी या वाघाला उपचाराची गरज असल्याचे वारंवार सांगितले, मात्र कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सल्ल्यावरून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. “लोकसत्ता” ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर तब्बल महिनाभराने त्याला बेशुद्ध करून तपासणी करण्यात आली आणि दुखण्याचे औषध देऊन त्याला परत जंगलात सोडण्यात आले. मात्र, दिवसेंदिवस त्याची प्रकृती चिंताजनक दिसून येत होती.
तब्बल साडेतीन महिन्यांपासून तो तीन पायांवरच चालत होता, त्याच्या एका पायाला गंभीर दुखापत असल्याने त्याला पायदेखील टेकवता येत नव्हता. “लोकसत्ता” ने परत यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले आणि न्यायालयाने या वृत्ताची दखल घेत स्वतावून याचिका दाखल केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने त्याला उपचारासाठी जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्राचा अनभिषिक्त सम्राट "सीएम" उर्फ "छोटा मटका" याचे भवितव्य आता जवळजवळ अंधारात सापडले आहे. या वाघाच्या समोरच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या व्याघ्रप्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर… pic.twitter.com/kVDJG54oI4
— LoksattaLive (@LoksattaLive) September 2, 2025
सुरुवातीला त्याची रक्त तपासणी करण्यात आली आणि दोन दिवसाने एक्स-रे करण्यात आला. या तपासणीत या वाघाच्या सांध्याला भेगा पडल्याचे आढळून आले. या खुलाशामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील बफर क्षेत्राचा हा अनभिषिक्त सम्राट पुन्हा जंगलात सोडता येईल का याबद्दल गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील एका प्रतिष्ठित ऑर्थोपेडिक सर्जनला वाघाची तपासणी करण्यासाठी बोलावण्यात आले होते. एक्स-रेचा अभ्यास करून आणि शारीरिक तपासणी करून, तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला की दुखापत झाल्यापासून बराच वेळ वाया गेला आहे, ज्यामुळे शस्त्रक्रिया करणे अशक्य झाले आहे. सांध्याच्या फ्रॅक्चरमध्ये सहभागामुळे रोगनिदान अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. अशा दुखापतीमुळे, वाघाची जंगलात शिकार करण्याची आणि जगण्याची क्षमता कमी होऊ शकते, असे मत नागपुरातील तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, छोटा मटकाच्या भविष्याबाबत अंतिम निर्णय गोरेवाडा येथील वन्यजीव संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे (डब्ल्यूआरटीसी) संचालक डॉ. शिरीष उपाध्ये यांनी वाघाची तपासणी केल्यानंतर घेतला जाईल.