RSS Dussehra Event At Reshimbagh Ground In Nagpur: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक अशा विजयादशमी उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. नागपूरमध्ये २ ऑक्टोबरला संघाच्या विजयादशमी सोहळा साजरा होणार आहे. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे तर ५ ऑक्टोबरला अमरावती येथे विजयादशमी सोहळा साजरा होणार असून या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आई कमलताई गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष होते. दीक्षाभूमीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. सध्या त्यांचे चिरंजीव राजेंद्र गवई हे स्मारक समितीचे सदस्य आहेत. या परिवारातील कमलताई गवई संघाच्या शताब्दी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे.

नागपूरमध्ये होणाऱ्या यावर्षीच्या सोहळ्याला संघ परिवारातील विविध संस्थांच्या प्रमुखांसह तब्बल पंधरा हजारांवर गणवेशधारी स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय संघाने विविध देशांच्या आंतरराष्ट्रीय दुतावासांनाही कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे यावर्षी विदेशी पाहुणे, चित्रपट अभिनेते, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील लोक उपस्थित राहणार आहे.

कमलताई गावेच्या उपस्थितीची चर्चा का?

विजयादशमीच्याच दिवशी १९२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. यंदा संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने संघाचा शताब्दी वर्षातील हा ऐतिहासिक विजयादशमी सोहळा राहणार आहे. तर दुसरीकडे दीक्षाभूमी हे नागपूरचे वैशिष्ट्य आहे. १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच दीक्षाभूमीच्या ठिकाणावरून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. हा विजयादशमीचा दिवस होता. त्यामुळे नागपूरमध्ये विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी आणि संघभूमी अशा दोन ठिकाणी प्रमुख कार्यक्रम असतात. यंदा संघाच्या शताब्दी वर्षाचा सोहळा अमरावती येथे पाच ऑक्टोबरला साजरा होणार असून दीक्षाभूमी उभारणीत प्रमुख वाटा असणाऱ्या परिवारातील कमलताई गवई या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झालेला आहे.

देशभरात पथसंचलनाचे आयोजन

शताब्दी वर्ष सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक स्वयंसेवक इच्छुक आहेत. मात्र, मैदानाची मर्यादा पाहता सर्वांना प्रवेश मिळणे अशक्य आहे. त्यामुळे यावर्षी नागपूरसह देशभरात संघाच्या शाखा असणाऱ्या विविध भागांमध्येही शताब्दी सोहळा साजरा होणार आहे. तसेच, नागपूरसह विविध शहरांमध्ये पथसंचलनाची तयारी सुरू असून प्रत्येकाने आपल्या भागात पथसंचलन करून शताब्दी सोहळा साजरा करावा, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.