नागपूर : तीन दिवसांपूर्वी खजुराहोच्या प्रसिद्ध जावरी मंदिरात असलेल्या भगवान विष्णूच्या खराब झालेल्या मूर्तीच्या दुरुस्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी तोंडी टिप्पणी केली. ते म्हणाले, “मूर्तीच्या दुरुस्तीसाठी स्वतः देवाला प्रार्थना करा. तुम्ही म्हणता की तुम्ही भगवान विष्णूचे कट्टर भक्त आहात, मग आता त्यांची प्रार्थना करा.

समाजमाध्यमावर सरन्यायाधीशांच्या या टिपण्णीवरून समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. आता विश्व हिंदू परिषदेनेही एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यांनी या पत्रकात सारन्यायाधीशांना एक सल्ला दिला आहे. न्यायालय हे न्यायाचे मंदिर आहे. भारतीय समाजाचा न्यायालयांवर गाढ विश्वास आणि विश्वास आहे. हा विश्वास केवळ अबाधितच राहणार नाही तर तो अधिक मजबूत होईल याची खात्री करणे आपले कर्तव्य आहे.

विशेषतः न्यायालयाच्या आत आपल्या भाषणात संयम ठेवणे आपले कर्तव्य आहे. ही जबाबदारी याचिकाकर्त्यांची, वकिलांची आणि न्यायाधीशांचीही आहे. आमचा असा विश्वास आहे की सरन्यायाधीशांच्या तोंडी टिप्पणीने हिंदू धर्माच्या श्रद्धेची थट्टा केली आहे. अशा टिप्पण्या करण्यापासून परावृत्त होणे चांगले होईल, असे विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी म्हंटले आहे. दरम्यान, भगवान विष्णूच्या मूर्तीच्या पुनर्बांधणीच्या प्रकरणात केलेल्या टिपण्णीवरून समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर सारन्यायाधीश भूषण गवई यांनी मी सर्वच धर्माचा आदर करतो, असे वक्तव्य केले. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे असलेल्या जवारी मंदिरातील भग्नावस्थेतील सात फूट उंच भगवान विष्णूची मूर्ती पुनर्निर्मित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.

सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्या. के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सुरुवातीलाच सरन्यायाधीशांनी ही याचिका ‘प्रसिद्धी याचिका’ असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले, “जर तुम्ही खरे विष्णूभक्त असाल तर प्रार्थना करा, ध्यानधारणा करा. देवाला स्वतःलाच विचारा की काही करावे.” याचिकाकर्त्याच्या वकिलांनी मूर्तीचे छायाचित्र दाखवत सांगितले की, मूर्तीचे शिर तुटलेले आहे व त्याची पुनर्निर्मिती करणे आवश्यक आहे.

मात्र, न्यायालयाने स्पष्ट केले की खजुराहोतील मंदिरे ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाच्या अखत्यारीत आहेत. “ही एक पुरातत्त्वीय धरोहर आहे. अशा पद्धतीने मूर्ती बदलणे किंवा नवी बसवणे हे एएसआयच्या नियमांनुसार मान्य होईल का, हा स्वतंत्र विषय आहे,” असे खंडपीठाने नमूद केले. न्या. गवई म्हणाले, “दरम्यान, जर तुम्हाला शैव परंपरेविरुद्ध काही हरकत नसेल, तर तेथे भगवान शंकराचे एक विशाल शिवलिंग आहे. त्याची पूजा करा.” शेवटी खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.