अमरावती: दिवंगत माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. कुठल्याही व्यक्तीला आपलेसे करण्याची त्यांची हातोटी होती. देशभरातील लोक दादासाहेबांशी जुळलेले होते. दादासाहेब जेव्हा रेल्वेने मुंबईला जायचे, तेव्हा अनेक आमदार त्यांच्यासोबत एकत्रित प्रवास करायचे. त्यावेळी रेल्वे म्हणजे विदर्भातील आमदारांचे एकत्रिकरणाचे ठिकाण होते. त्याकाळी दादासाहेबांचा जेवणाचा डबा फार प्रसिद्ध होता. त्यांचा डबा आला की जेवायला बसू, याची वाट अनेक आमदार पाहत असत. सगळ्यांसाठी जेवणाचा मोठा डबा आणि एकत्रित जेवणानंतर सर्वांना पान देत गप्पा मारणे, अशा प्रकारचे कौटुंबिक नाते दादासाहेबांचे होते, या शब्दात जुन्या आठवणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उजाळा दिला.
संत गाडगेबाबा अमरावती व़िद्यापीठानजीक उभारण्यात आलेल्या रा. सू. गवई यांच्या स्मारकाचे लोकार्पण आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, उपमुख्यमंत्रीद्वय एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आशीष जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दादासाहेब गवई यांनी दीर्घकाळ विधान परिषदेचे उपसभापती, उपसभापती म्हणून काम केले. विरोधी पक्षनेते म्हणून काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. ते त्यांच्या पक्षाचे एकमेव सदस्य असतानाही सर्वांचे त्यांची निवड सभापती म्हणून करण्यासाठी सर्वांचे एकमत व्हायचे, कारण प्रत्येक पक्षाला ते आसनावरून न्याय देतील, हा विश्वास वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना होता. त्यांनी विरोधकांसोबतही कधी कटुता ठेवली नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, दादासाहेब गवई यांनी आपल्या विचारांशी कधीही तडजोड केली नाही. नागपूर येथील दीक्षाभूमीच्या उभारणीतही त्यांचे फार मोठे योगदान राहिले आहे. लोकसभेची पहिली निवडणूक ते डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विरोधात लढले. त्यावेळी त्यांची इच्छा देखील नव्हती. त्यांचे आणि पंजाबराव देशमुख यांचे संबंधही अत्यंत चांगले होते. भाऊसाहेबांचा आदर देखील ते करायचे. पण, विचारांसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यात जी जबाबदारी मिळाली, ती पत्करली. पक्षाने सांगितले ते उभे राहिले. त्यावेळी ते लोकसभेला निवडून येऊ शकले नाहीत. पण, त्यानंतर अनेक वर्षांनी याच अमरावतीमधून १९९८ मध्ये लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले. संत गाडगेबाबा यांच्या किर्तनाच्या आधी दादासाहेब गवई यांचे भाषण व्हायचे. अंधश्रद्धेवर ते प्रहार करायचे. समाजातील अनिष्ठ रुढी, परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी कार्य केले. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी हे स्मारक दिशादर्शक ठरेल.
